
मुंबई – शिवेसनेत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली असून यात आणखी एकाची भर पडणार आहे ती म्हणजे माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते-पाटील यांची. ते आज शिवेसनेत प्रवेश करणार आहेत.
शिवसेनेत जाणार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे!
धवलसिंह मोहिते-पाटील आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांच्या बैठकीतच पक्षप्रवेश करणार असून धवलसिंह आपल्या तडाखेबाज भाषाशैलीसाठी ओळखले जातात. त्याचबरोबर ते जनसेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्षही आहेत. जनसेवा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात काम केले आहे. सध्या ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य असून, शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षही आहेत.
धवलसिंह यांचे वडील प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर सोलापूरच्या खासदारकीची पोट निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधान परिषदेचे आमदारपद भूषवले.
पिता-पुत्र पक्षांतरासाठी कायम चर्चेत असल्यामुळे धवलसिंह शिवसेनेत किती दिवस टिकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
