बंद होणार आरटीओ कार्यालय ?

rto
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाढता भ्रष्टाचार लक्षात घेत राज्यातील आरटीओ कार्यालये येत्या काही काळात बंद करण्याचे संकेत दिले आहेत.

आरटीओ कार्यालये ही सध्याच्या काळात भ्रष्टाचाराची कुरण बनली असून, तिथे फक्त लक्ष्मी दर्शनाचाच बोलबाला असल्याची टीका नितीन गडकरी यांनी केली असून येत्या काही महिन्यांमध्ये आऱटीओ ऐवजी दुसरी कार्यप्रणाली वाहतूक विभागात अस्तित्वात आणण्याचे संकेतही गडकरींनी दिले.

आरटीओमध्ये नागरिकांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नसून साध्या साध्या कामांसाठी देखील पैसे उकळले जात असल्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालय आऱटीओला पर्याय ठरेल अशी यंत्रणा येत्या काही महिन्यांमध्ये राबवण्याचा विचार करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

आजच्या घडीला राज्यात आरटीओ कार्यालयात सामान्य माणसाला वाहन परवाना काढण्यासाठी तासनतास रांगेत थांबांवे लागते तसेच अनेक फेऱ्या माराव्या लागतात. अन्यथा लायसन्स एंजट गाठावा लागतो. या सर्व कटकटीतून सामान्य माणसाची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

त्यामुळे आता आरटीओऐवजी नवी यंत्रणा कशी असणार, ती किती परिणामकारक असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment