रस्ता सुरक्षा; कडक उपाय हवेतच

road-safety
भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे दिल्लीत एका रस्ते अपघातात दुर्दैवीरित्या मरण पावले. दिल्लीमध्ये वाहतुकीचे नियम कसे सरळ सरळ मोडले जातात हे बर्‍याच जणांना माहीत आहे. परंतु एका वृत्तवाहिनेने ते प्रत्यक्ष दाखवले तेव्हा सर्वाना हादरा तर बसलाच पण त्या शहरामध्ये दररोज सरासरी पाच जण रस्त्यावरच्या अपघातात मरण पावतात यात काही नवल नाही असेच सर्वांना वाटले. आपल्या देशामध्ये रस्ते वाहतुकीच्या बाबतीत कसलाच धरबंध पाळला जात नाही. मग पूर्ण देशाची अवस्था अशी असेल तर देशाच्या राजधानीतली वेगळी कशी असणार? याही अर्थान दिल्ली देशाची राजधानी शोभते. देशात वाहनांची संख्या वाढत आहे. परंतु संख्येच्या वाढीबरोबरच वाहतुकीच्या बाबतीतील सुरक्षिततेबाबत जागरूकता मात्र वाढत नाही. त्यामुळे वाढती वाहनांची संख्या वाढत्या सोयींना जन्म देण्याऐवजी वाढत्या अपघातांनाच चालना देत आहे. किंबहुना भारतामध्ये असेच चित्र दिसत आहे.

भारतात रस्त्यावरील अपघात हे मृत्यूचे मोठेच कारण होऊन बसले आहे. भारतामध्ये कर्करोगाने अनेक लोक मरण पावतात, लहान मुले हगवणीने मरतात, अनेक प्रकारचे रोग किंवा वृद्धापकाळ हे मृत्यूचे एक कारण असणे सामान्य आहे. परंतु मानवाच्या हातून होणार्‍या चुकांमुळे लोक मरत असतील तर त्यावर कुठे तरी विचार करावा लागणार आहे. भारतामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण सर्वात जास्त आहे. खरे म्हणजे भारतात वाहनांची संख्या वाढत असली तरी ती अजून तुलनेने कमीच आहे. अमेरिका, रशिया, चीन, जपान किंवा कोणत्याही यूरोपीय देशांच्या तुलनेने विचार केला तर भारतातल्या वाहनांची कथित भरमसाठ संख्या कमीच भासेल. अमेरिकेत दर दोन माणसांमागे एकाकडे कार आहे, भारतात हे प्रमाण १०० माणसांमागे एक कार एवढे सुद्धा नाही. याचा अर्थ भारतात वाहनांची संख्या येत्या काही वर्षात प्रचंड वाढणार आहे. आताच ती तुुलनेने कमी असताना एवढे अपघात होत आहेत तर प्रगत देशांएवढी संख्या झाल्यास काय होईल, याचा अंदाजही करवत नाही. भारतात सध्या दर तासाला पंधरा जण रस्त्यावरच्या वाहनांच्या अपघातात मरतात आणि ५८ जण जखमी होतात.

चीनमध्ये सुद्धा हे प्रमाण असेच होते, परंतु चीनने वाहतुकीविषयीचे कायदे कडक करून आणि जनजागृती करून हे प्रमाण कमी केले आहे. भारतात अगदी महामार्गावरून प्रवास करताना सुद्धा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कारण वाहने चालविणार्‍या लोकांनी वाहन चालविण्याविषयीचे तारतम्याने पाळावे लागणारे नियम सुद्धा पाळायचे नाहीत असेच ठरवलेले आहे. दररोज होणार्‍या अपघातांची कारणे शोधायला लागल्यास आपल्या असे लक्षात येते की, आहेत ते कायदे न पाळल्यामुळे हे अपघात झालेले असतात. रात्रीच्या वेळी वाहन चालवताना समोरचा दिवा पूर्णपणे चालू न ठेवता निम्मा चालू ठेवावा आणि त्यासाठी दिव्याचा अर्धा भाग काळ्या रंगाने रंगवलेला असावा असा कायदा आहे. तो केवळ कागदावरच आहे. हा कायदा पाळून निम्म्या दिव्याला काळा रंग लावणारे एकही वाहन भारतात सापडणार नाही. असे किती तरी नियम चक्क धाब्यावर बसवून भारतामध्ये भराभर वाहने चालविली जातात आणि मौल्यवान मानवी जीव बळी जातात.

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू वाहतुकीचे दोन साधे नियम न पाळल्यामुळे झालेला आहे हे आता सर्वांना ठाऊक झालेले आहे. गाडीत बसणार्‍या व्यक्तीने सिट बेल्ट बांधला पाहिजे आणि लाल दिवा लागताच वाहन चौकात थांबले पाहिजे. हे नियम काही फार अवघड आहेत असे नाही. सिट बेल्ट बांधावा यासाठी काही प्रत्येक वाहनाजवळ पोलीस उभा करावा लागत नाही. लोकांनी स्वत:च्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी तो नियम पाळायचा आहे. पण तो कोणी पाळत नाही आणि पोलीस सुद्धा सिट बेल्ट न बांधणार्‍यांवर कारवाई करत नाहीत. सिट बेल्ट बांधून गाडी चालविणारा एकही वाहन चालक दृष्टीला पडत नाही आणि त्याबद्दल कारवाई झाल्याचे एकही उदाहरण या देशात सापडत नाही. म्हणजे वाहतुकीचे नियम पाळण्याच्या बाबतीत लोक जितके बेदरकार आहेत तितकेच पोलीस सुद्धा कारवाई करण्याच्या बाबतीत आळशी आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर नवा कायदा करण्याच्या संबंधात चर्चा सुरू केली होती. येत्या काही आठवड्यात तो कायदा येईल सुद्धा. त्या नव्या कायद्याने अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल सुद्धा. परंतु जोपर्यंत लोकांच्याच मनामध्ये कायदा पाळण्याविषयीची प्रवृत्ती वाढत नाही आणि पोलिसांमध्ये छोट्या-मोठ्या चुकांसाठीही कठोर कारवाई करण्याची जागरूकता वाढत नाही तोपर्यंत कितीही कडक कायदे करून काही उपयोग नाही.

Leave a Comment