राहुल-प्रियंका संघर्ष

rahul-gandhi
कॉंग्रेस पक्षात राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. खरे तर हा संघर्ष या दोघांत नसून या दोघांच्या समर्थकांत आहे. राहुल गांधी यांच्यामुळे पक्षाचे भवितव्य सुरक्षित राहील की प्रियंकामुळे राहील हा वादाचा मुद्दा आहे आणि त्यातून हे दोन समर्थक गट तयार झाले आहेत. प्रियंका वड्रा यांच्याकडे नेतृत्व सोपवावे ही मागणी जोर धरायला लागताच राहुल गांधीही सावध झाले आहेत आणि त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. उलट प्रियंका वड्रा यांना पक्षाची सूत्रे दिल्यास त्या पक्षात चैतन्य आणू शकतील असा विश्‍वास पक्षातल्या एका गटाला वाटत आहे. प्रियंका वड्रा यांनी राजकारणात खरोखरच उडी घेतली तर आपण निष्प्रभ होऊन जाऊ अशी भीती राहुल यांना वाटत असणारच. कारण त्यांनी नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि अमेथी या दोनच मतदारसंघात प्रचार केला. पण या प्रचारात त्यांनी नरेन्द्र मोदी यांच्या प्रचाराला चोख उत्तर दिले होते. त्यांच्या भाषणात राहुल गांधी यांच्यापेक्षा अधिक आक्रमकता होती. त्यामुळे आता त्याच पक्षाला तारतील असा विश्‍वास कार्यकर्त्यांना वाटत आहे.

त्यातून ही चर्चा सुरू झाली आहे आणि ती आता रंगायला लागली आहे. दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्यागत पोस्टर युद्धही सुरू झाले आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्यापेक्षा प्रियंकाचे अधिक आकर्षण वाटू नये यासाठी राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत थोडा आक्रमकपणा दाखवला. त्यामुळे आता प्रियंका वड्रापेक्षा ते अधिक सक्षम आहेत असे लोकांना वाटत आहे. राहुल गांधी यांचा आक्रमकपणा तेवढ्यापुरताच होता पण त्यांनी तो दाखवून दिला. काल त्यांच्या पाठीराख्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनात आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात अलाहाबादेत काही डिजिटल फलक लावले. त्या फलकांत राहुल गांधी आता वादळ (आँधी) बनतील आणि ते देशाचे दुसरे महात्मा गांधी होतील असा दावा केला गेला असून ते आता कॉंग्रेसला पुढे नेतील असे म्हटले आहे. या फलक लावणारांनी प्रियंका वड्रा यांना संसाराची सूत्रे सांभाळण्याचा सल्ला दिला आहेे. याचा अर्थ कॉंग्रेसमध्ये राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिण आणि भाऊ यांच्यात पोस्टर युद्ध सुरू झाले आहे. या सार्‍या लाजीरवाण्या संघर्षात पक्षश्रेष्ठींनी मात्र मौन पाळले आहे. पक्षाने या बाबत अजूनही अधिकृत काही धोरण जाहीर केलेले नाही. पण पूर्वीच संदिग्ध भूमिका जाहीर झाली आहे. प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय होणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कालचे पोस्टर युद्ध हे काही नवे नाही, काही अतिउत्साही कार्यकर्ते आपल्या परीने काही तर्क करतात आणि असे पोस्टर्स लावतात असे श्रेष्ठींचे म्हणणे आहे. हे अतिउत्साही कार्यकर्ते अजाण असले तरीही त्यांच्या प्रियंका गांधी यांच्या समर्थनातून पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते कोणत्या दिशेने विचार करीत आहेत यावर प्रकाश पडला आहे हे नाकारता येत नाही. काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. ते लोकसभेत ज्या पद्धतीने सभापतींच्या समोर धावले त्यावरून ते आता आँधी होतील आणि महात्मा गांधी यांची जागा घेतील असे त्यांना वाटत आहेच पण प्रियंका गोधी यांनी घर गृहस्थी सांभाळावी असा सल्ला ते देतात याचा अर्थ पक्षात आता कोणाचा आब राहिलेला नाही. काही कार्यकर्ते मात्र एवढेे टोकाला गेलेले नाहीत. ते प्रियंकाची मागणी करीत आहेत पण राहुलला बाद करीत नाहीत. राहुल, सोनिया आणि प्रियंका या तिघांनीही पक्षाचे नेतृत्व सांभाळावे असे त्यांचे आवाहन आहे. हे त्यांच्या दृष्टीने ठीक असले तरीही त्यातून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गांधी घराण्याप्रती असलेली शरणागत वृत्ती लाजीरवाणी आहे. ती लोकशाहीशीही विसंगत आहे. असे आपण कितीही म्हटले तरीही कॉंग्रेसचे नेते या घराण्याविषयी असलेल्या या निष्ठेचा अभिामानच बाळगत असतात.

प्रियंका गांधी यांनी दोनच मतदारसंघातल्या आपल्या आक्रमक प्रवृत्तीने नरेन्द्र मोदी यांना जशास तसे उत्तर देऊन निरुत्तर करून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना प्रभावित केले असेल तर कॉंग्रेसश्रेष्ठी त्यांना पुढे करण्यास का कचरत आहेत हा एक प्रश्‍न आहे. कदाचित त्यांना प्रियंका गांधी यांच्याही मर्यादा जाणवत असतील. त्यांनी मोदींना उत्तर दिले असले तरीही त्यात वैचारिकतेचा काही अंश नव्हता. विचारसरणी, तत्त्वज्ञान असे मुद्दे समोर येतात तेव्हा सोनिया, राहुल आणि प्रियंका या तिघांच्या खात्यावर शंंख जमा असल्याचे दिसते. भाजपाचे नेते जातीयवादी आहेत, ते देशात विभाजन घडवत आहेत, त्यांनी महागाई केली आहे, कॉंग्रेस हा पक्ष सेेक्युलॅरिझम मानणारा आहे, आम्ही सर्वांना न्याय देणार आहोत अशी काही लिहून दिलेली वाक्ये वाचून किंवा म्हणून दाखवण्यापलीकडे त्यांना काही येत नाही. तेव्हा प्रियंका वड्रा यांनी मोदींना प्रचारातल्या उथळ वाक्यांना काही उत्तरे दिली म्हणून त्या काही फार कर्तबगार ठरत नाहीत. त्यांची बाकीची पोच जेमतेमच आहे. या बाबतीत त्यांना झाकावे आणि राहुलला काढावा असा प्रकार असेल तर प्रियंकांना समोर आणून असे काय साध्य होणार आहे असा प्रश्‍न कॉंग्रेस श्रेष्ठींना पडला असणार. पण कॉंगे्रस पक्ष अडचणीत आला असताना या पक्षाला नेतृत्वाचे पर्याय एकाच घराण्यात शोधावे लागतात यातच या पक्षाच्या अन्य नेत्यांची लायकी लपलेली आहे.

1 thought on “राहुल-प्रियंका संघर्ष”

  1. श्रीनिवास जोशी.

    खड्ड्यात गाडून बुलडोझर फिरउ ही भाषा अत्यंत अयोग्य आहे. त्याऐवजी “कठोरात कठोर शिक्षा करू”
    ही भाषा योग्य होईल .कोणत्याही परिस्थितीत गाडता येणे शक्य होणार नाही हे गडकरी यांना माहीत नाही का ? असली भाषा बेजबाबदार नेत्यांच्या तोंडी शोभून दिसते. गडकर्यांच्या तोंडी कदापि नाही.

Leave a Comment