नारळी भात

narali-bhat
राखी पौर्णिमेला किवा नारळी पौर्णिमेला सर्वसाधारण पणे केल्या जाणार्‍या गोड पदार्थात नारळाचा वापर करण्याची प्रथा आहे. बहुतेक घरात या दिवशी नारळीभात केला जातो. त्याची कृती पुढील प्रमाणे

साहित्य- दोन वाट्या तांदूळ, नारळाचा चव एक वाटी , चार लवंगा, दोन वाट्या गूळ, अर्धी वाटी साखर, वेलदोड्याची पूड, जायफळाची पूड, भाजून थोडीशी कुटलेली खसखस साधारण दोन चमचे, तीन ते चार चमचे साजूक तूप

कृती- प्रथम तांदूळ (आंबेमोहर असल्यास उत्तम) धुवून तासभर ठेवावे. नारळ खरवडून घ्यावा. गूळ बारीक चिरून घ्यावा. पातेल्यात थोडे म्हणजे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून त्यावर चार लवंगा घालाव्यात. लवंगा तडतडल्या की तांदूळ घालून थोडे परतावे. नंतर तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. चवीसाठी किचित मीठ भात शिजतानाच घालावे.

शिजलेला भात परातील गार करण्यासाठी ठेवावा. नंतर जाड बुडाच्या अथवा नॉनस्टीक पॅनमध्ये प्रथम थोडे साजूक तूप घालावे. नंतर त्यावर भाताचा एक थर, खोवलेल्या नारळाचा एक थर, गुळ साखरेचा एक थर पुन्हा भाताचा थर असे एकावर एक थर घालावेत. पातेले मंद गॅसवर ठेवावे व त्यावर पाणी भरलेले झाकण ठेवावे. थोड्या वेळाने वाफ येऊन गुळ साखर विरघळू लागली की जायफळ पूड, वेलदोडा पूड व कुटलेली खसखस घालून हलवावे आणि पुन्हा आवश्यतेनुसार दोन तीन वाफा द्याव्यात. भात वाढताना वरून साजूक तूप घालावे. हा भात अतिशय रूचकर लागतो आणि गार गरम कसाही चांगला लागतो. भात मोकळा झाला पाहिजे. आवडत असल्यास काजू बदाम तुकडेही घालता येतील.

Leave a Comment