जायंट किलर केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा

kesarkar
मुंबई – नारायण राणेंसाठी जायंट किलर ठरलेल्या आमदार दीपक केसरकर यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला असून ५ ऑगस्ट रोजी ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे.

गेल्या महिन्यातच आपण राष्ट्रवादी सोडत असल्याचे दीपक केसरकरांनी जाहीर केले होते, तसेच त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणाही केली होती. आपल्या तत्वांशी, स्वाभिमानाशी तडजोड करणे अशक्य असल्याने सिंधुदुर्गातील गुन्हेगारी प्रवृत्तींशी लढण्यासाठी आपण राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना आणि नीलेश राणेंना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केलेला असतानाही केसरकरांनी राणेंविरोधात भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या सर्व प्रकारामुळे केसरकर व त्यांचे समर्थक नाराज झाले होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला.

उद्धव ठाकरे ५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात येणार असून तेव्हा आपण त्यांच्या उपस्थितीतीच पक्षात प्रवेश करणार असल्याचे केसरकरांनी सांगितले. सिंधुदुर्गचा विकास हेच आपले ध्येय होते व यापुढेही आपण त्यासाठीच काम करू असे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण सावंतवाडीतूनच निवडणूक लढवू असे संकेतही त्यांनी दिले.

Leave a Comment