
ट्रॉम्सो : आजपासून (दि. 1 ऑगस्ट) नॉर्वेमध्ये प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात होत असून यात विक्रमी 179 देशांनी सहभाग घेतला आहे. भारताला या स्पर्धेत 19 वे मानांकन मिळाले असून विश्वनाथन आनंद, हरिकृष्णासारख्या दिग्गज खेळाडूंच्या गैरहजेरीतही पथकाने यशाबद्दल महत्त्वाकांक्षी असल्याचे मत नोंदवले आहे. विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसन हा यजमान संघाचा स्टार खेळाडू असेल. त्याशिवाय, रशियाचे ब्लादिमिर क्रॅमनिक, सर्जेई कर्जाकिन, अर्मेनियाचा लेव्हॉन ऍरोनियन, बल्गेरियाचा व्हॅसेलिन टोपालोव्ह हे देखील स्पर्धेसाठी दाखल झाले आहेत.
ऑलिम्पियाड स्पर्धेला आजपासून सुरुवात
महिला गटात हंगेरीची ज्युडित पोल्गार हिच्या प्रदर्शनाबाबत उत्सुकता असेल. महिला वर्ल्ड चॅम्पियन यिफान होऊ चीनतर्फे पहिला सामना खेळेल तर कॅटरिना लाहनो प्रथमच रशियन संघातर्फे खेळणार आहे.
सध्या वर्ल्डकप चॅम्पियनशिप तयारीमध्ये गुंतलेल्या विश्वनाथन आनंदने यंदाही ऑलिम्पियाड स्पर्धेतून माघार घेतली आहे. यापूर्वी 2004 मध्ये स्पेन ऑलिम्पियाड स्पर्धेत तो सहभागी झाला होता. यंदा भारतीय संघाचे नेतृत्व बहरातील परिमार्जन नेगीकडे असणार असून बी. अधिबन, एम. आर. ललित बाबू, एस. पी. सेतुरमण, 33 वर्षीय शशिकिरण यांचा भारतीय पथकात समावेश आहे.
