
ग्लासगो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या चंद्रकांत माळीने कांस्यपदक मिळवून देत नवा इतिहास रचला. त्याने पुरुषांच्या 94 किलोग्रॅम वजनगटात तिसरे स्थान काबीज केले.
राष्ट्रकुल स्पर्धा; चंद्रकांत माळीला वेटलिफ्टिंगचे कांस्य!
338 किलोग्रॅम (150-188) वजन उचलत चंद्रकांत माळीने इव्हेंटमध्ये तिसरे स्थान संपादन केले. पहिल्या दोन प्रयत्नात स्नॅचमध्ये त्याला 146 किलोग्रॅम व 150 किलोग्रॅम वजन उचलता आले होते. पण, तिस-या प्रयत्नात तो 153 किलोग्रॅम वजन उचलण्यात अपयशी ठरला. क्लीन व जर्कमध्ये त्याने 183 किलाग्रॅम व 188 किलोग्रॅम उचलले. मात्र, इथेही तो 194 किलोग्रॅम वजन उचलू शकला नाही.
पापुआ न्यू गिनिचा स्टीव्हन कुकूना करी 349 किलोग्रॅम वजन उचलत या इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला तर ऑस्ट्रेलियाच्या सिम्प्लाईस रिबोऊमने रौप्य जिंकले. यंदा वेटलिफ्टिंगमध्ये भारताने 3 सुवर्ण, 3 रौप्य व 5 कांस्य अशी सर्वाधिक 11 पदके काबीज केली आहेत.
