अँसिड हल्ला ; पीडितांना विमा कवच, केंद्र सरकार सकारात्मक !

acid
मुंबई : अँसिड हल्ल्यातील पीडितांना लवकरच विमा कवच पुरवले जाणार आहे. अशा घटनांत जखमी झालेल्यांवर वैद्यकीय उपचारासाठी व्यापक विमा धोरण राबवण्याची मागणी एका स्वयंसेवी संस्थेने केंद्र सरकारकडे केली आहे. या मागणीची दखल घेत केंद्र सरकारनेही धोरण आखण्याला गती दिल्याचे समजते.मागील तीन वर्षांत राज्यात अँसिड हल्ल्याच्या जवळपास ३५ घटनांची नोंद झाली आहे. त्यातील २५ घटना मुंबई शहरात घडल्याचे उघडकीस आले. अशा घटनांत जखमी होणार्‍या तरुणींवर वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असते. ही मदत न मिळाल्यास उपचाराअभावी काहींना प्राणही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर अँसिड हल्ल्यातील पीडितांना वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच पुरवण्याबाबत कोलकाता येथील एका स्वयंसेवी संस्थेने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारने या संदर्भातील प्रस्तावावर कार्यवाहीला गती दिली असून चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत विमा कवचच्या धोरणाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल, असा विश्‍वास संबंधित स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment