राष्ट्रीय महामार्गावर अपघात, चार ठार

accident
मुरबाड – आज सकाळी मुरबाड-माळशेज मार्गावर खाजगी प्रवासी जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात जीपमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही प्रवासी जीप टोकवडेहून मुरबाडच्या दिशेने चाललेली असताना वडाचापाडा गावाजवळ लोखंडी प्लेट घेऊन जाणा-या कंटेनरमधून बाहेर आलेल्या प्लेटने जीपचा पत्रा कापला. यामध्ये जीपमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर, पाच जण जखमी झाले.

या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने कंटेनरला आग लावत रास्तारोको केला. त्यामुळे मुरबाड, सरळगावपर्यंत वाहनांची लांब रांग लागली होती. पोलिसांनी जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव पोलिसांचे काहीही ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हता.

वैशाखरे गावातील दिपक घरत यांच्या मालकीची ही जीप असून, या जीपमधुन तेराजण प्रवास करत होते. माळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रं. २२२ जवळ हा अपघात झाला. या अपघातातील सर्व मृत टोकवडेचे रहिवासी आहेत.

Leave a Comment