सर्व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा – राज ठाकरे

raj
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामार्ग ते गल्लीबोळ्यातील रस्त्यांपर्यंतच्या कामामध्ये चालू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा असे आदेश पदाधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांवर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे टीकेची तोफ डागतील अशी चिन्हे आहेत. त्याचबरोबर काम करणा-यांनाच पक्षात स्थान व पद दिले जाईल असे खडे बोलही त्यांनी पदाधिका-यांना सुनावले आहेत.

मनसेच्या पदाधिका-यांची आज मुंबईत राज ठाकरे यांनी बैठक बोलवली होती. यात राज ठाकरेंनी खड्ड्यांवरुन मुंबई महापालिकेवर टीका केली. ‘रस्त्याच्या कामासाठी टेंडर काढायचे, सहा महिन्यांत खराब होईल असा रस्ता बांधायचा. त्या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी संबंधित ठेकेदाराला जाब विचारायचा सोडून खड्डे भरण्यासाठी आणखी एक ठेकेदार नेमायचा’ असे उद्योग मुंबई महापालिकेत सुरु असल्याची टीका त्यांनी केली. पादचा-यांसाठी बांधण्यात येणा-या पदपथावरही फेरीवाल्यांना मोकळीक दिली जाते. दादरमध्ये एका फेरीवाल्याने चक्क आयुक्त सीताराम कुंटे यांच्या नावानेच पावती फाडली. यावरुन भ्रष्टाचाराने यंत्रण किती पोखरली आहे हे दिसते. भ्रष्टाचाराचे असे सर्व रॅकेट उघड करा असे राज ठाकरेंनी पदाधिका-यांना सांगितले.

Leave a Comment