दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघावर भारत ‘अ’ ची मात

manish
डार्विन – भारत अ संघाने येथे सुरू असलेल्या चौरंगी वनडे मालिकेत तिवारी व मनीष पांडे यांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका अ संघावर 70 धावांनी शानदार विजय मिळविला.

73 चेंडूंत तिवारीने 93 धावा फटकावल्या तर पांडेने 108 चेंडूंत 91 धावा जमविल्या. त्यांच्या खेळीच्या बळावर भारत अ ने 50 षटकांत 7 बाद 326 अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यानंतर धवल कुलकर्णीच्या भेदक माऱयासमोर मधली फळी कोसळल्यामुळे द.आफ्रिका अ संघाचा डाव 47.1 षटकांत 256 धावांतच आटोपला. तिवारी व पांडे यांनी तिसऱया गडय़ासाठी 124 धावांची भागीदारी करीत भारतीय विजयाचा पाया रोवला. तिवारीने 73 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार व एक षटकार मारला तर पांडेने आपल्या खेळीत 7 चौकार व एक षटकार मारला. अखेरच्या टप्प्यात अंबाती रायुडू (20 चेंडूंत 32) व संजू सॅमसन (13 चेंडूंत 24) यांनी फटकेबाजी केल्यामुळे भारत अ ला सव्वातीनशेची मजल मारता आली.

त्याआधी रॉबिन उत्थप्पा केवळ 2 धावा काढून बाद झाला. 19 वर्षांखालील वयोगटाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद व पांडे यांनी दुसऱया गडय़ासाठी 84 भागीदारी केली असली तरी त्यांना जलद धावा करता आल्या नाहीत. उन्मुक्त 47 धावांवर बाद झाला. त्याने 62 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार ठोकले. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला.

द.आफ्रिका अ संघाने 54 धावांची सलामी देत चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले. धवल कुलकर्णीने खेळपट्टीकडून साथ मिळाल्यावर चेंडू `मूव्ह’ केले. परवेझ रसूलने (2-48) प्रारंभीचे गडी मिळवून दिल्यावर कुलकर्णीने मधली फळी कापून काढत 54 धावांत 5 बळी मिळविले. द.आफ्रिका अ तर्फे रीझा हेन्ड्रिक्सने सर्वाधिक 52 धावा जमविल्या.