‘ग्लास बीच’;समुद्रकिनार्‍याची रंजक कथा

glass-beach
कॅलिफोर्निया- जगाच्या पाठीवर अनोख्या वैशिष्ट्याचे व स्वत:ची वेगळी ओळख असलेले अनेक समुद्रकिनारे आहे. आपले सौंदर्य व रचनेमुळे ते पर्यटकांना आकर्षित करून घेतात. कॅलिफोर्नियाच्या फोर्टब्रॅगमध्येही असाच आपले आगळेपण जपणारा एक समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा ‘ग्लास बीच’ नावाने ओळखला जातो. कारण या समुद्रकिनार्‍यावर नावाप्रमाणेच पाहावे तिकडे रंगबिरंगी काचेचे तुकडे नजरेस पडतात.

निसर्ग आपली करामत व चमत्कार दाखवून विविध अद्भूत संरचना जन्मास घालतो. मात्र या समुद्रकिनार्‍याची रचना निसर्गाने केलेली नाही. मॅककॅरिशर नावानेही प्रसिद्ध असलेल्या या समुद्रकिनार्‍याची कथा अतिशय रंजक आहे. २0व्या शतकामध्ये फोर्ट ब्रॅग शहरातील लोकांनी आपल्या घरात जमा होणार कचरा डोंगरावरून खाली फेकण्यास सुरुवात केली. या कचर्‍यासोबत कालांतराने काचेचे तुकडे, खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि जुनाट वाहनाचे सुटे भागही फेकले जाऊ लागले. कॅलिफोर्निया स्टेट वॉटर बोर्डाने पुढे हे क्षेत्र बंद केले आणि अनेक वर्षे त्याची सापसफाई केली. पाण्यातून कचरा बाहेर काढण्यात यश आले, पण काचेचे तुकडे तिथेच राहिले. त्यानंतर एका खासगी कंपनीने या ग्लास बीचचा मॅककॅरिशर स्टेट पार्कमध्ये समाविष्ट केले. या समुद्रकिनार्‍यावर कोट्यवधीच्या संख्येने रंगबिरंगी विविध आकाराचे काचेचे तुकडे पसरलेले आहेत.