गडकरींच्या नेतृत्वाला भाजपमधूनच आक्षेप ?

nitin-gadkari
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याचे संकेत मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मुख्यत्वे मुंडे समर्थकांचा गडकरी यांना विरोध असताना आता देवेंद्र फडणवीस यांचे समर्थकही नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गडकरींचे नेतृत्व लादण्याची खेळी बूमरँग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व देण्यात येणार होते. मात्र, मुंडे यांचे निधन झाल्याने राज्याच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले . त्यानंतर राज्याच्या निवडणुकीत सामूहिक नेतृत्व असेल, असे सांगण्यात आले . प्रत्यक्षात आता गडकरी यांना पुढे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याला आता आक्षेप घेण्यात येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी गडकरी यांनी जुळवून घेतल्यानंतर संघाचे पाठबळ मिळाल्याने त्यांना केंद्रीय रस्ते वाहतूकसारखे मोठे खातेही मिळाले. आता गडकरी यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविण्याची व्यूहरचनाही आखण्यात येत आहे.

नेतृत्वाची उणीव भरून काढण्यासाठी गडकरी यांना पुढे केले जात असले, तरी गडकरी यांना पक्षातूनच मोठा विरोध आहे. मोदी यांनी त्यांचे नाव रेटले असले तरी त्यांना राज्यात कितपत सहकार्य मिळेल, याबाबत साशंकता आहे. अर्थातच त्यांच्याकडे धुरा सोपविल्यास पक्षाला त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यात गडकरी यांचे धोरण हे मनसेकेंद्रित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे संबंध तितकेसे चांगले नाहीत. त्यामुळे गडकरी यांच्याकडे नेतृत्व आल्यास शिवसेना व भाजपात संघर्षाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment