
वॉशिग्टन- मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्यात सामील असलेला पाकिस्तानातील हफीज सईद याची जमात उल दावा ही संघटना दहशतवादी संघटनाच असल्याचे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने घोषित केले असून त्या संस्थेच्या अमेरिकेतील सदस्यावर आर्थिक निर्बंद लादले आहेत. दहशतवादी संघटना लष्करे तैय्यबा भोवतीचा फास अमेरिकेने आवळत आणला असून त्याचाच एक भाग म्हणून जमात उल दावा लाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले गेले आहे. पाकिस्तानाने मात्र या संघटनेला कल्याणकारी संस्था म्हणून मान्यता दिली आहे.
हफीजची जमात उल दावा दहशतवादी संघटनाच
जमात उल दावा सोबतच जन्नत उल दावा, अल अनफल ट्रस्ट,तेहरिक न हुरमत इ रसूल, तेहरीक ए तहाफुज कबला अब्वाल या संघटनांनाही दहशतवादी आणि लष्करच्या सहयोगी संघटना म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या संस्थांना अर्थपुरवठा करणारे नझीर महम्मद चौधरी व मुहम्मद हुसेन गील यांना अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून टार्गेट करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे दोघेही लष्करे तैय्यबासाठी काम करत असल्याचे सांगून अमेरिकेने संघटनेच्या तसेच तैय्यबाशी संबंधित अन्य संघटनांच्या अमेरिकेतील मालमत्ता व त्यासंबंधीच्या व्यवहारावर निर्बंध लादले आहेत. चौधरी व हुसेन सह अन्य २२ जणांनाही अमेरिकेने दहशतवादी म्हणून घोषित केले असून त्यातील चार जण लष्करे तैय्यबाशी संबंधित आहेत.
