गुगलचे अँड्राईड आता कार, टिव्ही व घड्याळांतही

google2
स्मार्टफोनसाठी अँड्राईड ही ऑपरेटिंग सिस्टीम जगभरात लोकप्रिय ठरल्यानंतर गुगलने आता ही सिस्टीम कार, टिव्ही आणि स्मार्टवॉचसाठीही विकसित केली असून व्यवसाय वाढीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे. गुगलचे अँड्राईड आज जगातील प्रत्येक चार स्मार्टफोनपैकी तीन स्मार्टफोनसाठी वापरले जात असून ही सेवा गुगलसाठी मनीमेकींग सेवा ठरली आहे. त्यामुळे आता इंटरनेट कनेक्टेड अन्य उपकरणांसाठीही अँड्राईडचा वापर करण्यात येणार असल्याचे गुगलच्या वार्षिक डेव्हलपर परिषदेत जाहीर करण्यात आले आहे.

या वर्षात अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीम असलेली पहिली कार बाजारात आणली जाणार असून गुगलबरोबर अँड्राईडसाठी ४० वाहन कंपन्यांनी करार केले आहेत. याचा उपयोग ऑटो सॉफ्टवेअर, नेव्हीगेशन, संगीत व मेसेजिंग सेवेसाठी कारमध्ये होऊ शकणार आहे. तसेच आजही सॅमसंग, एलजीची स्मार्टवॉचही अँड्राईडवरच आहेत. टिव्हीसाठीही अँड्राईडचा वापर लवकरच केला जाणार आहे.गुगलने सेवा क्षेत्रातील विस्तारात हेल्थ, फिटनेस माहितीसाठीही सेवा सुरू केली आहे. भारत आणि चीन या दोन मोठ्या व विस्तारण्याची खूप क्षमता असलेल्या बाजारात गुगल आणि अॅपलमध्ये बरोबरी आहे. भारतात अॅपलच्या पुढे जाण्यासाठी गुगल हिवाळ्यात ४.५ इंची स्क्रीन व डयुएल सिमकार्ड असलेला १०० डॉलर्स किमतीचा स्मार्टफोन सादर करत असल्याचे गुगलचे समीत सिन्हा यांनी सांगितले.

Leave a Comment