साधूंची टोळी?

pawar
राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे साधूंची टोळी नव्हे. साधू किंवा संत ज्या प्रकारचे समाजाच्या हिताचे काम करत असतात तशा कामाची आमच्याकडून अपेक्षा ठेवू नका, असे या पक्षाचे संस्थापक श्री. शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. आपला पक्ष म्हणजे संतांची टोळी नव्हे हे आपण लोकांना पहिल्यांदाच सांगत आहोत असा कदाचित पवारांचा गैरसमज असेल, परंतु लोकांचा तसा गैरसमज नाही. त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे साधूंची टोळी नसून संधीसाधूंची टोळी आहे हे लोकांना मागेच समजलेले आहे. मात्र निरनिराळ्या कारणांनी लोकांनी त्यांना निवडून दिले आणि त्यामुळे लोक आपल्याला प्रामाणिक समाजसेवक समजतात असे पवारांना वाटत गेले. मात्र लोक त्यांना निवडून देत होते कारण लोकांना पर्याय सापडलेला नव्हता. आता पर्याय सापडलेला आहे आणि पवारांनी कितीही नखरे केले तरी भारतातली जनता त्यांना आणि त्यांच्यासारख्या ढोंगी नेत्यांना राजकारणातून बाद करणार आहेत. खरे म्हणजे त्यांनी आपला पक्ष म्हणजे काय नाही हे सांगितले आहे, पण त्यावरून हा पक्ष काय आहे हे आपोआप समजते. पवारांनी आपल्या पक्षाची ही खरी ओळख मराठा आणि मुस्लीम आरक्षणाच्या निमित्ताने करून दिली आहे.

या दोन समाजाला आपण दिलेले आरक्षण साधुत्वाच्या भूमिकेतून म्हणजे त्या समाजाच्या हिताच्या भूमिकेतून दिलेले नसून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मतांचा स्वार्थ साधला जावा यासाठी दिलेले आहे असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. ही गोष्ट स्पष्ट करताना श्री. शरद पवार यांनी उगाच ताकाला जाऊन भांडे लपवणार नाही असे ‘प्रामाणिक’पणे म्हटले आहे. एखाद्या चोराने आपण चोर आहोत असे प्रामाणिकपणे मान्य केले म्हणजे तो प्रामाणिक साव ठरत नसतो, तर तो प्रामाणिक चोरच ठरत असतो. तेव्हा पवारांनी मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षणाची हुलकावणी दाखवून मतांची अपेक्षा ठेवली आहे हे प्रांजळपणे कबूल केले याचा अर्थ ते प्रांजळ संत ठरत नाहीत, तर प्रांजळ पण स्वार्थी नेते ठरतात. पवारांच्या या स्पष्टोक्तीनंतर तरी मराठा आणि मुस्लीम समाजाच्या मतदारांचे डोळे उघडतील अशी आशा आहे. काल एका वृत्तवाहिनीवर या विषयावर चर्चा सुरू होती आणि तिच्यात सहभागी झालेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक हे मात्र आपल्या पक्षाने घेतलेला मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचा निर्णय त्या समाजाच्या कसा हिताचा आहे हे परोपरीने समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. आपल्या पक्षाला या दोन मागासलेल्या समाज घटकांच्या दुरवस्थेची किती चिंता आहे हे ते कमालीच्या नकली पोटतिडकीने सांगत होते. आपले नेते शरद पवार याच विषयावर वेगळे पण सत्य बोलत आहेत याची नवाब मलीक यांना काही कल्पना नव्हती. पण त्यांना ती नसली तरी ते किती ढोंगीपणाने बोलत होते हे शरद पवार यांच्या विधानांवरून स्पष्टपणे लक्षात येत होते.

शरद पवार हे कमीत कमी, मोजके आणि संयमाने बोलणारे नेते म्हणून सर्वांना माहीत आहेत. परंतु हेच मितभाषी शरद पवार जास्त बोलायला लागले की, ते असे काही बोलतात की ज्यामुळे त्यांचीच पंचाईत होऊन बसते आणि त्यांचे राजकीय नुकसान सुद्धा होते. असे हे शरद पवार विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी म्हणून लगबगीने कामाला लागले आहेत आणि या कामाचा एक भाग म्हणून काही काही बोलायलाही लागले आहेत. परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये निराशा, घाई यामुळे संयम राहिनासा झाला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारच्या पराभवाला कॉंग्रेसचे कर्तृत्व कारणीभूत आहे असे विधान केले. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झालेला आहेच, पण आता विधानसभेच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होणार हे त्यांना समजून चुकले आहे. म्हणून त्या संभाव्य परिणामाची जबाबदारी आताच पवारांनी कॉंग्रेसवर ढकलली आहे. त्यांच्या अशा विधानांमुळे या दोन मित्रपक्षात आधीच असलेले वितुष्ट वाढत असते आणि त्याचा परिणाम दोघांनाही भोगावा लागतो याचे भान पवारांना नाही.

सध्या शरद पवार यांनी आपले प्रदेशाध्यक्ष बदलून भरपूर पैसे खर्च करण्याची क्षमता असलेल्या सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. शिवाय जितेंद्र आव्हाड आणि भास्कर जाधव यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे. आपण आता दिवसाचे बारा तास काम करणार आहोत असे पवारांनी जाहीर केले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवाला एकटा कॉंग्रेस पक्ष जबाबदार असेल आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा काहीच दोष नसेल तर पवार आपल्या पक्षात एवढे फेरबदल का करत आहेत, याचा काही बोध होत नाही. पराभवाला आपल्याही पक्षाची काही रचना कारणीभूत आहे हेच ते या बदलातून मान्य करत आहेत. पण लोकांना काहीच कळत नसते अशा भ्रमात ते साळसूदपणाचा आव आणून बोलत असतात. खरे म्हणजे आघाडी सरकारच्या पराभवाला आणि बदनामीला या दोन पक्षापैकी नेमके कोण आणि किती जबाबदार आहे याचा हिशोबच मांडण्याचा ठरवला तर पराभवाची जबाबदारी पवारांच्या राष्ट्रवादीकडेच जास्त येते. कारण आघाडीच्या मंत्रिमंडळातील अधिक भ्रष्ट मंत्री राष्ट्रवादीचेच आहेत आणि कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण हे भ्रष्टाचारापासून दूर असलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. पण पवार मात्र त्यांच्याच पदरात माप घालत आहेत. पवारांची ही खरी ओळख मात्र लोकांना पूर्वीच झालेली आहे आणि त्याचे प्रत्यंतर विधानसभा निवडणुकीत येणारच आहे.

Leave a Comment