अव्वल स्थानावरून कोहलीची घसरगुंडी

virat-kohli
दुबई – एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरून भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याची घसरण झाली आहे. त्याचे हे स्थान दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने पटकाविले आहे.

विराट कोहलीला बांगलादेशविरुध्द झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आयसीसीने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीतून आपले स्थान गमवावे लागले आहे. आता डिव्हिलिर्यसने कोहलीपेक्षा चार गुण अधिक मिळवीत अव्वल स्थान पटकाविले आहे. डिव्हिलियर्स कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीतही पहिल्या स्थानावर आहे. या यादीत कोहली दहाव्या स्थानावर आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे फिरकीपटू रवींद्र जडेजा सातव्या आणि आर. अश्विन 17 व्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचा खेळाडू मोहम्मद हाफीज या यादीत पहिल्या स्थानावर आहे. संघांच्या क्रमवारीत भारताचा संघ श्रीलंकेसह तिसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांचे गुण 112 आहेत.

Leave a Comment