
सहा महिने कोमात राहिल्यानंतर शुद्धीवर आलेला फॉर्म्युला वन रेसिंग कारचा बाहशहा मायकेल शूमाकर याला यापुढचे आयुष्य अपंगत्व घेऊनच जगावे लागणार असल्याचे समजते. शुद्धीवर आल्यानंतर मायकेलला उपचारासाठी स्वित्झर्लंडला नेले गेले आहे. तेथील न्यूरोसर्जन आणि वरीष्ठ मेडिकल अधिकारी एरिच रिएडेरेट यांनी मायकेल पुन्हा पहिल्यासारखा कधीच होऊ शकणार नाही असे मत व्यक्त केले आहे.
अपंगत्वासहच शूमाकरला जगावे लागणार
डॉक्टरांच्या मते मायकेलसाठी कार चालविणे दूरच पण स्वतःच्या पायावर उभे राहता आले तरी तो चमत्कार म्हणावा लागेल. १६ जूनला कोमातून शुद्धीवर आल्यानंतर मायकेलच्या केलेल्या तपासण्यांमध्ये त्यांच्या मेंदूचे मार लागल्यामुळे मोठेच नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन महिन्यांत उठून बसणे आणि सहा महिन्यांत व्हिलचेअरचा वापर करणे जरी मायकेलला जमले तरी ती मोठीच सफलता असेल असेही या डॉक्टरांचे मत आहे. कारण सहा महिने कोमात राहिल्यानंतर जे पेशंट शुद्धीवर येतात ते केवळ १० टक्के इतकीच शारिरीक आणि मानसिक क्षमता परत मिळवू शकतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे.
