जपानची बुलेट ट्रेन ७ मिनिटांत होते स्वच्छ

bullet
उत्तम टाईम मॅनेजमेंटचे उदाहरण पाहायचे असेल तर जपानच्या टेसेई या बुलेट ट्रेन साफ करण्याचे काम करणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्याकडे पाहावे लागेल. जपान जगात अनेकविध आश्चर्यकारक गोष्टींमुळे जसा प्रसिद्ध आहे तसाच तो तेथील हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळेही प्रसिद्ध आहे. येथील सर्वाधिक वेगाची बुलेटट्रेन शिन्कासेन हिचा वेग आहे तासाला २५० किमी. ही गाडी कधीही पाहिली तरी स्वच्छ, साफ सुथरीच असते कारण त्यामागे असतात टेसेईचे तप्तर कर्मचारी.

या बुलेट ट्रेनची सफाई अवघ्या सात मिनिटांत केली जाते. ही ट्रेन कधीच लेट न होण्यामागचे हे महत्त्वाचे कारण आहे. अगदी लेट झालीच तर ती ३६ सेकंदाने लेट होते. सेव्हन मिनिटस शिन्कासेन थिएटर्स या नावाने या गाडीसाठी साफसफाईचा कार्यक्रम आहे. ही गाडी साफ करण्यासाठी कर्मचारी वर्ग ती टोकियो स्टेशनमध्ये येण्यापूर्वीच फलाटावर सज्ज असतो. प्रवाशांची गर्दी होण्यापूर्वीच २२ क्लिनर्सच्या ११ टीम गाडीची साफसफाई हाती घेतात. अत्यंत नियोजनपूर्वक प्रत्येक कोपरा न कोपरा साफ केला जातो अवघ्या सात मिनिटांत. टोकियो स्टेशनवर दिवसात २१० बुलेट ट्रेन येजा करतात. या गाड्या स्टेशनवर १२ मिनिटांचा हॉल्ट घेतात. या सर्व गाड्यांची सफाई याच पद्धतीने केली जाते.

टेसेई कंपनीकडे यासाठी ८०० कुशल कर्मचार्‍यांचा जथा आहे. प्रत्येक कोचची सफाई होताच हे कर्मचारी त्वरीत गाडीबाहेर पडतात. इतकेच नव्हे तर रेल्वे प्रवाशांचे फलाटावर स्वागतही करतात. प्रवाशांना आनंद मिळावा म्हणून हे कर्मचारी टोपीत सुंदरसे फूलही अडकवितात असेही समजते.

Leave a Comment