आमच्या मुलींनी कमी पगाराची नोकरीही करावी – मिशेल, बराक ओबामा

obama
आमच्या मुलींनी कमी पगाराच्या नोकरीचा अनुभव घेतला पाहिजे असे आम्हाला वाटते असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी टिव्हीवरील मुलाखतीत व्यक्त केले आहे. आज देशातील बहुतेक राजकारणी आपल्या मुलांनी ऐषारामाचे आयुष्य जगावे यासाठी प्रयत्नशील असताना जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे आपल्या मुलांबाबतचे हे मत विशेष ठळकपणे समोर आले आहे.

या मुलाखतीत हे दांपत्य म्हणाले की कायद्याची पदवी घेण्यापूर्वी त्या दोघांनीही कमी पगाराच्या नोकरीचा अनुभव घेतला आहे. बराक यांनी रॉबिन बास्कीन आईस्क्रीम पार्लरमध्ये सहाय्यक व पेंटर म्हणून तर मिशेल यांनी बुकबायडिंगच्या दुकानात नोकरी केली आहे. जीवनात हा अनुभव खूपच महत्त्वाचा ठरला तसेच त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असे त्यांचे म्हणणे आहे.

आमच्या मुली आता किशोरावस्थेत आहेत आणि जीवनाचे हे सत्य त्यांनी जाणून घ्यावे असे आम्हाला वाटते असे सांगताना मिशेल म्हणाल्या की जगातल्या प्रत्येक मुलाला कठीण काम म्हणजे काय असते याचा अनुभव असायला हवा. पैसे कमावणे हे इतके सोपे नाही याची जाणीव त्यांना व्हायला हवी. कदाचित हे काम आनंददायक नसेलही पण जगातील लक्षावधी लोक दररोज अशी कष्टाची कामे करत असतात हे त्यांनी जाणून घ्यायला हवे. कष्टाचे महत्त्व कधीच कमी नसते हे कळायला हवे.

आईवडिलांच्या या विचारांमुळेच कदाचित मोठी मलिया हिने सीबीसी टिव्ही कार्यक्रमात सहाय्यकाचे काम केले असावे असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment