अहंकाराचे फळ

nitishkumar
बिहारमधली भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (यू) यांच्यातली युती १७ वर्षे टिकली होती. राज्यातल्या या दोन पक्षातल्या नेत्यांमध्ये चांगला समन्वयसुध्दा होता. परंतु नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय व्हायला लागला आणि नितीशकुमार हे त्यांचा द्वेष करायला लागले. त्यातून त्यांनी नरेंद्र मोदींच्या बिहारमधल्या सभांवर बंदी घातली. त्यांनी सभा घेतल्या तर युती मोडू अशी धमकी दिली. या धमक्या भाजपा नेत्यांनी काही दिवस सहन केल्या. पण पुढे मात्र वाद वाढत गेले. नितीशकुमार यांनी भाजपाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करत मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करू नये असा आग्रह धरला. शेवटी युती मोडली. या घटस्फोटाचे परिणाम काय होतील याचा अंदाज नितीशकुमार यांना आला नाही. आता मात्र त्याचे परिणाम जाणवायला लागले आहेत. केवळ बिहारच नव्हे तर उत्तर प्रदेशातसुध्दा मोदी इफेक्टमुळे राजकारणातली समीकरणे बदलण्याचा संकेत मिळत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यात मिळून भाजपाला १०० वर जागा मिळाल्या आहेत. २८३ जागांमध्ये १०० जागा ही काही किरकोळ कमाई नाही.

भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचा आधार असे या १०० जागांना म्हणता येईल. त्यामुळे या दोन राज्यांमध्ये या निकालाचे परिणाम जाणवत असतील तर त्यात नवल काय? उत्तर प्रदेशात तर मुलायमसिंग आणि मायावती या दोघांच्याही पक्षाची वाताहत झाली आहे. ही मोडतोड रोखण्यासाठी अखिलेशसिंग प्रयत्न करत आहेत. त्यांनी राज्यातल्या विविध पदावर नेमलेल्या राज्यमंत्र्याचा दर्जा असणार्‍या ३६ पदाधिकार्‍यांची पदे काढून घेतली आहेत. काही मंत्र्यांनाही वगळण्याचा प्रयत्न आहे. बिहारमध्ये मात्र नेतृत्वबदल झाला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या तिसर्‍याच दिवशी मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्याच्या विधानसभेत स्पष्ट बहुमत असलेल्या नितिशकुमार यांच्या जनता दल (यू) या पक्षाला लोकसभेच्या ४० पैकी केवळ २ जागा मिळाल्या आहेत. त्याने तडकाफडकी राजीनामा जाहीर केला परंतु पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी राजीनामा परत घ्यावा म्हणून मिनतवार्‍या केल्या नाहीत. कारण शरद यादव यांना नितिशकुमार यांचा राजीनामा हवाच होता. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच या दोघातले मतभेद उघड झाले होते. शरद यादव याने एका भाषणात लालूप्रसाद यादव आणि नितिशकुमार या दोघांहीवर जातीयवादी राजकारण करण्याचा आरोप केला होता.

नितिशकुमार आणि शरद यादव यांच्यातले हे मतभेद गेल्याच वर्षी स्पष्ट झाले होते. नितिशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत जी द्वेषमूलक भूमिका घेतली आहे. ती शरद यादव यांना पसंत नाही. नरेंद्र मोदी विकासाचा अजेंडा पुढे मांडतात आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतात मग आपणच का होऊ शकत नाही असे नितिशकुमार यांचे म्हणणे आहे. ते पूर्णपणे सार्थ नाही. नितिशकुमार यांनी बिहारमध्ये विकासाचा वेग वाढवला आहे. परंतु मोदी १४ वर्षे मुख्यमंत्री पदावर आहेत आणि नितिशकुमार यांची कारकिर्द त्या मानाने कमी आहे. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून झालेली निवड केवळ विकास या एका मुद्यावर झालेली नाही. तर त्यांचा पक्ष राष्ट्रव्यापी आहे. त्याचाही लाभ त्यांना झाला आहे. मात्र या गोष्टीचा विचार न करता नितिशकुमार सातत्याने मोदींचा द्वेष करत आले. त्यापोटी युती मोडूनही नितिशकुमार यांचे सरकार पडले नाही आणि ते याच समाधानात राहिले. पण मोदी लाटेमध्ये त्यांचे समाधान धुवून गेले आणि त्यांना केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले.

भारतीय जनता पार्टीचे नेते त्यावेळी सावध झाले आणि त्यांनी मोदी लाटेने प्रभावित झालेल्या जनता दल (यू) आमदारांवर जाळे फेकायला सुरूवात केली. काही आमदार फुटले तर हा फुटीर गट आणि भाजपा यांचे सरकार स्थापन होऊन जनता दलचे सरकार संपुष्टात येण्याची शक्यता दिसायला लागली. दुसर्‍या बाजूला रामविलास पासवान आणि कॉंग्रेस यांची युती नितिशकुमार यांच्यापेक्षा आघाडीवर राहिली. याचा अर्थ या पुढच्या काळात भाजपा आणि लालूप्रसाद यांच्यात राजकारणाचे धु्रवीकरण होणार आणि जनता दल (यू) पक्ष कायम तिसर्‍या क्रमांकावर जाणार. म्हणून शरद यादव यांनी पक्षातल्या आमदारांची नाराजी कमी करत नितिशकुमार यांचा पत्ता काटला. अन्यथा ही नाराजी महागात पडली असती. पक्षही फुटला असता आणि सत्ताही गेली असती. आता सत्ता टिकली असली तरी जनता दल (यू) अनेक आमदारांना भाजपाशी युती करावी असे वाटते. शरद यादव यांनाही तसेच वाटते. पण नितिशकुमार यांचा अहंकार आडवा आला. भाजपा आणि जनता दल (यू) यांची युती टिकली असती तर शरद यादव यांची केंद्रातली किंमत किती वाढली असती याची कल्पना करून शरद यादव यांना पश्‍चात्ताप होत असेल. युती मोडण्यापूर्वी शरद यादव हे रालो आघाडीचे निमंत्रक होते मात्र नितिशकुमार यांच्या मोदी द्वेषामुळे त्यांची चांगली संधी गेली. यामुळे या दोघांतली मतभेदांची दरी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. तूर्तास सरकार टिकले असले तरी मोदी इफेक्टमुळे या सरकारवर कायम टांगती तलवार राहणार आहे.

Leave a Comment