मावळते पंतप्रधान

manmohansingh_17
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग भारताच्या इतिहासामध्ये आपला बरा वाईट कसा का असेना पण ठसा उमटवून आता निवृत्त होत आहेत. येत्या १७ तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आपला राजीनामा सादर करतील. डॉ. मनमोहन सिंग यांनी गेल्या जानेवारीतच आपण पुन्हा पंतप्रधान होण्यास उत्सुक नसल्याचे जाहीर केले होते. तेव्हा आता नरेंद्र मोदी पंतप्रधान होवोत की शरद पवार होवोत पण मनमोहन सिंग यांची कारकिर्द संपलेली आहे हे नक्की. भारताच्या इतिहासात पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी हे प्रदीर्घ काळ पदावर राहिलेले पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. त्यांच्यामागे गांधी नेहरू घराण्याचा करिश्मा तरी होता पण मनमोहन सिंग यांच्या मागे घराण्याचा करिश्मा नसताना आणि कसल्याही राजकीय कार्याची पार्श्‍वभूमी नसताना ते दहा वर्षे पंतप्रधान पदावर राहिले. त्यांच्या परीने तो एक विक्रमच झाला. अर्थात, त्या मागची कारणे काय आणि त्यांनी दहा वर्षे पंतप्रधान राहून काय केले हे वेगळे चर्चेचे विषय आहेत.

मनमोहन सिंग दहा वर्षे पंतप्रधान तर राहिलेच पण १९९१ ते १९९६ अशी पाच वर्षे ते अर्थमंत्रीही होते. त्यांनी या अर्थमंत्रीपदावरून या देशात मुक्त अर्थव्यवस्था राबवली. त्यांना पंतप्रधान नरसिंहराव यांचे भक्कम राजकीय पाठबळ होते. त्यामुळे मुक्त अर्थव्यवस्थेवर भरपूर टीका झाली तरीही मनमोहन सिंग खंबीरपणे मुक्त अर्थव्यवस्था राबवू शकले. मनमोहन सिंग यांच्यापूर्वी पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात मुक्त अर्थव्यवस्था मुक्तपणे राबवली. परंतु त्यांनी, त्यांच्या पक्षाने आणि संघ परिवाराने मनमोहन सिंग यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळात मुक्त अर्थव्यवस्थेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. ही अर्थव्यवस्था राबवल्यास देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल इथंपर्यंत त्यांच्या टीकेची मजल गेली होती. मात्र नरसिंहरावही डगमगले नाहीत आणि त्यामुळे मनमोहन सिंगही खंबीर राहिले आणि या देशामध्ये ही अर्थव्यवस्था दृढमूल झाली. ती पाच वर्षे आणि त्यांच्या पंतप्रधानपदाची दहा वर्षे अशी १५ वर्षे भारताच्या अर्थकारणावर मनमोहन सिंग यांच्या कामाचा प्रभाव होता. आता मागे वळून पाहताना मनमोहन सिंग यांच्या आयुष्यातील या योगायोगाचे आश्‍चर्य वाटते. पी. व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी देशाची अर्थव्यवस्था बदलून टाकण्याचा निर्धार केला. कारण ते अपरिहार्य होते. मात्र त्यांना त्यासाठी सक्षम अर्थमंत्री हवा होता. त्यांच्या डोक्यात आय. जी. पटेल यांचे नाव निश्‍चित झाले होते.

श्री. पटेल १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते आणि त्यांनी अर्थमंत्री पदावरून चांगले काम केले होते. त्यामुळे नरसिंहराव यांनी त्यांनाच ऑफर दिली. मात्र त्यावेळी पटेल यांचे वय जवळपास ९० वर्षे होते. त्यांनी श्री. राव यांची ऑफर नाकारली. त्यामुळे त्यांना पर्यायी नावाचा विचार करावा लागला. श्री. पटेल यांनीच मनमोहन सिंग यांचे नाव सुचवले आणि मनमोहन सिंग यांचे नशीब खुलले. पटेलांनी नाव सुचवले नसते तर मनमोहन सिंग यांच्या आयुष्यामध्ये अर्थमंत्रीपदाचीही संधी नव्हती आणि त्यामागोमाग चालून आलेली पंतप्रधानपदाचीही संधी नव्हती. खरे तर २००४ सालीसुध्दा दिल्लीत नेमके काय घडले आणि सोनिया गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आपल्या हाती आलेले पंतप्रधानपद सोडून मनमोहन सिंग यांना ते दिले. याबाबतीतले गूढ अजूनही कायम आहे. पण अर्थमंत्री पदाप्रमाणेच योगायोगाने काही गूढ कारणांनी मनमोहन सिंग यांना देशाचे सर्वोच्च पद मिळाले. कसल्याही प्रकारची राजकीय पार्श्‍वभूमी नसताना झालेले ते पहिलेच पंतप्रधान होते. त्यांचे चारित्र्य शुध्द असल्यामुळे त्याचा पंतप्रधान म्हणून असलेला व्यवहार पारदर्शक राहिला. मात्र त्यांची ही पारदर्शकता त्यांच्या वैयक्तिक व्यवहारापुरतीच मर्यादित राहिली.

पंतप्रधान म्हणून त्यांचा मंत्रिमंडळावर आणि सरकारववर म्हणावा तेवढा वचक नव्हता त्यामुळे सरकारमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यावर त्यांनी पंतप्रधान म्हणून जसा अंकुश ठेवायला हवा होता तसा ते ठेवू शकले नाही. ते पंतप्रधान असले तरी नाममात्र पंतप्रधान आहेत आणि सत्तेची सारी सूत्रे सोनिया गांधी यांच्या हाती आहेत. असेच चित्र वारंवार निर्माण होत राहिले. सोनिया गांधी यांचे व्यवहार पारदर्शक नाहीत. त्यामुळे त्यांच्या संशयास्पद व्यवहाराचा सारा कोळसा मनमोहन सिंग यांच्या नावावर उगाळला गेला. पंतप्रधान म्हणून त्यांना अधिकार गाजवायला मिळाला नाही. मात्र सरकारमध्ये जे काही वाईट घडले. त्याचा कलंक मात्र त्यांच्या नावावर लागला. ही परिस्थिती त्यांना बदलता आली नाही. ते उत्तम अर्थमंत्री होते. तितकेच ते दुबळे पंतप्रधान ठरले. भारताच्या लोकशाहीत पंतप्रधान हा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख असतो आणि देशाच्या राजकारणा बरोबरच समाजकारणातील बदलांनाही दिशा देऊ शकत असतो. अर्थात, अशा क्षमतेचे पंतप्रधान भारताला अपवादानेच लाभले. मनमोहन सिंगही या परंपरेला अपवाद ठरले नाहीत. यशस्वी अर्थमंत्री पण अयशस्वी पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग आता निवृत्त होत आहेत.

Leave a Comment