घातक सूडचक्र

modi
नरेन्द्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांशी सूडबुद्धीने वागणार नाही असे आश्‍वासन दिले आहे. खरे तर त्यांनी सत्तेवर आल्यानंतर रॉबर्ट वड्राला जेलची हवा खायला पाठवायला हवे आहे. इतका या जावयाचा भ्रष्टाचार उघड आणि शिक्षेस पात्र आहे पण मोदींची नजर विकासावर आहे. देशासमोर अनेक प्रश्‍न आहेत. ते आधी सोडवायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा कोणाला तरी धडा शिकवणे हे काही सत्तेवर येण्यामागचे उद्दिष्ट होऊ शकत नाही अशी उदात्त भूमिका त्यांनी घेतली आहे. ते वड्रावर कारवाई करण्याची गरज असताना तिला नकार देत आहेत आणि कॉंग्रेसचे नेते हातातून सत्ता चालली तरीही जाता जाता मोदी यांच्या एका तकलादू प्रकरणात त्यांची चौकशी जाहीर करीत आहेत. जी चौकशी करण्याची गरजही नाही पण केवळ मोदी यांना कसे त्रस्त करता येईल यासाठी मनमोहन सिंग सरकारने मोदी यांच्या या प्रकरणाची चौकशी जाहीर केली आहे. येत्या १६ तारखेला सारा देश निवडणुकीचे निकाल पाहण्यात दंग असतानाच तिकडे मावळत्या सरकारचा या चौकशीचा निर्णय राबवायला सुरूवात होईल.

जगाच्या इतिहासात असा प्रकार कधी घडलेला नसेल. इतका तो असभ्यपणाचा आणि सूडबुद्दीने घेतलेला आहे. लोकशाहीत अशा चौकशांचे प्रकार सुरूच असतात. विरोधकांच्या मागे चौकशाचे शुक्लकाष्ठ लावले जाते. कॉंग्रेसने तर गेल्या पाच वर्षात याच अस्त्राचा वापर करून आपले बहुमत टिकवले आहे. सत्ताधारी पक्षाची फारच कोंडी झाली की, तो पक्ष या मार्गाचा अवलंब करतो. त्यासाठी चौकशी करणार्‍या संस्थांचा गैरवापर सुद्धा केला जातो. जगन मोहन रेड्डुी यांच्या बाबतीत असा वापर वेगाने केला गेला पण पण कारवाईचा हाच वेग रॉबर्ट वड्रा यांच्या बाबतीत दिसला नाही. किंबहुना ती कारवाईच दिसली नाही. टू जी स्पेक्ट्रम प्रकरणात तर कारवाईचे नाटकच झाले आणि चौकशीची कारवाई गोगलगायीपेक्षाही कमी गतीने चालायला लागली. ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आली तेव्हा न्यायालयाने ही चौकशी वेगाने झाली पाहिजे असा आग्रह तर धरलाच. पण न्यायालयाचा याबाबत सरकारवर विश्‍वास नसल्यामुळे न्यायालयाने ही चौकशी आपल्या निरीक्षणाखाली सुरू केली, तेव्हा कुठे ती पूर्ण झाली. अन्यथा चौकशीचे नाटक करून ए. राजा यांना वाचविण्याचा सरकारचा इरादा होता. आता या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोेदी यांच्या चौकशीवरून लक्षात आल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या एका मित्राने अहमदाबादमध्ये शिकायला असलेल्या आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याची विनंती केली. त्यासाठी अमित शहा यांनी राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचा वापर केला असा आरोप आहे.

या प्रकरणात गुप्तचर यंत्रणा, अमित शहा किंवा मोदी यांनी त्या मुलीला त्रास दिलेला नाही. ती बिघडू नये म्हणून तिच्या वडिलांनी तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते. ते त्यांनी ठेवले असा आरोप आहे. हे प्रकरण उघड होताच कॉंग्रेसच्या नेत्यांचे डोळे चमकले. या प्रकरणावरून मोदींना अडचणीत आणता येईल आणि त्यांचा करिश्मा कमी करता येईल असे त्यांना वाटले. केंद्र सरकारने या प्रकरणात हात घालण्याच्या आधीच मोदींनी स्वत:च राज्य सरकारकडून या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत काही आढळले नाही. मात्र तेवढ्यावरून कॉंग्रेसच्या नेत्यांचा आत्मा थंड झाला नाही. कारण त्यांना हे प्रकरण मोदींच्या बदनामीसाठी वापरायचेच आहे. आता निवडणुकीच्या घाईत चौकशी जाहीर करणेही अनुचित आहे. परंतु नरेंद्र मोदींचा मुखभंग करण्यास कॉंग्रेसचे नेते एवढे आतूर झालेले आहेत की, त्यांना उचित आणि अनुचित यातला फरकही कळेनासा झाला आहे. रॉबर्ट वड्राची चौकशी करण्यासाठी तीन तीन वर्षे चालढकल करणार्‍या कॉंग्रेस सरकारला नरेंद्र मोदींच्या या प्रकरणाची चौकशी आठ दिवस सुद्धा लांबणीवर टाकता आली नाही.

एवढी तत्परता दाखवून १६ मे रोजी म्हणजे निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच ही चौकशी करणार्‍या निवृत्त न्यायमूर्तींची घोषणा केली जाईल असे जाहीर करून टाकले. १६ मे रोजी सरकार बदलणार आहे, आपल्या हातातली सत्ता जाणार आहे, ती गेली नाही तरी निदान नेतृत्वबदल तरी नक्कीच होणार आहे. अशा परिस्थितीत ही चौकशी जाहीर करून आपल्या निर्लज्ज सूडभावनेचे दर्शन घडवू नये एवढी सभ्यता सुद्धा कॉंग्रेसच्या नेत्यांना पाळता आली नाही. अनेक निवृत्त न्यायमूर्तींनी या प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला. ही त्यांच्या दृष्टीने नामुष्कीच असते. पण कॉंग्रेसने आपल्याच पक्षातल्या एका निवृत्त न्यायमूर्तीला यासाठी घोड्यावर बसवले आहे. कसेही करून नरेंद्र मोदींच्या चारित्र्यावर एक ढब्बा पाडायचाच असे कॉंग्रेस नेत्यांनी नक्कीच केले आहे. त्यांच्या संपु आघाडीतल्या निदान दोन नेत्यांना तरी कॉंग्रेसचा हा निर्णय पसंत पडलेला नाही. शरद पवार आणि डॉ. फारूक अब्दुल्ला या दोघांनी अशी चौकशी करणे अनुचित असल्याचे म्हटले आहे. या मतभेदांची कॉंग्रेसला चिंता नाही. कारण हातातून सत्ता जाण्याच्या क्षणाला आघाडी फुटली काय की टिकली काय, याची त्यांना काळजी नाही. त्यांनी आपला निर्धार कायम ठेवला आहे. त्यांचा निर्धार काहीही असो, पण चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही हे पवार आणि अब्दुल्ला यांना माहीत आहे. मग ज्या गोष्टीतून काही निष्पन्न होणार नाही त्या गोष्टीसाठी सभ्यपणाला तीलांजली देऊन अशी चौकशी करायचीच कशाला, असा त्यांचा सवाल आहे.

Leave a Comment