ओलांद यांचा दावा, सिरियाकडे रासायनिक अस्त्रे

पॅरिस –  सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशल-अल-असाद यांच्या सरकारकडून रासायनिक अस्त्रांचा वापर केला जात आहे. त्याची आमच्याकडे ‘माहिती’ आहे, परंतु त्याबद्दलचे ठोस पुरावे नाहीत, असा दावा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवॉँ ओलांद यांनी केला आहे. आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार असाद यांनी अलीकडेच रासायनिक अस्त्राचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. रेडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओलांद यांनी हा दावा केला आहे, परंतु त्याचे स्पष्टीकरण त्यांनी देण्याचे टाळले. या अगोदर फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन फॅबियस यांनीदेखील रेडिओला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला होता.

असाद यांच्या लष्कराने आपल्याच नागरिकांच्या विरोधात राबवलेली पद्धत अत्यंत भयंकर आहे. त्यामुळेच ते सत्ता सोडणार नाहीत. गेल्या वर्षी असाद सरकारने आॅगस्टमध्ये बंडखोरांवर रासायनिक अस्त्रांचा वापर केला होता. त्यानंतर अमेरिका-रशिया यांच्या मध्यस्थीने वाटाघाटीसाठी झाल्या होत्या. सिरियाप्रश्नी रशियाने मध्यस्थी केल्यानंतर गेल्या वर्षी अमेरिका-रशिया यांच्या उपस्थितीत एक करार झाला होता. त्यानुसार जून महिन्यापर्यंत सिरियाला रासायनिक हत्यारे नष्ट करावी लागणार आहेत, अन्यथा सिरियावर अमेरिकेकडून लष्करी कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पूर्वीच देण्यात आला आहे.