गार्डियन व वॉशिंग्टन पोस्टला पुलित्झर पुरस्कार

जगातील बहुसंख्य देशांतील संदेश दळणवळणावर अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेकडून केल्या जात असलेल्या हेरगिरीच्या बातम्या प्रसिद्ध करणार्‍या ब्रिटनच्या गार्डियन व अमेरिकेच्या वॉशिग्टन पोस्ट या वृत्तपत्रांना लोकसेवेसाठी देण्यात येणारा यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय संरक्षण संस्थेत कॉन्टॅक्टर म्हणून काम करत असलेल्या एडवर्ड स्नोडेन याने हे हेरगिरीचे प्रकरण उघड करून त्यासंदर्भातील कागदपत्रे या वृत्तपत्रांना पुरविली होती आणि त्यानुसार त्यांनी बातम्यांची मालिकाच प्रसिद्ध केली होती.

या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सार्‍या जगात एकच खळबळ उडाली होती आणि अमेरिकेचे अनेक मित्रराष्ट्राबरोबर असलेले संबंध तणावपूर्ण झाले होते. अमेरिकेतील कोलंबिया जर्नालिझम युनिव्हर्सिटीकडून हे पुरस्कार वरील दोन वृत्तपत्रांना दिले गेले आहेत. सध्या रशियात आश्रय घेतलेल्या स्नोडेनने त्याबद्दल आनंद व्यक्त करताना अनेक धमक्या मिळूनही या वृत्तपत्रातील वार्ताहरांनी निर्भिडपणे बातम्या छापल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. पुरस्कार निश्चितीसाठी नेमलेल्या समितीने गार्डियन कडून दाखविल्या गेलेल्या आक्रमक पत्रकारितेमुळे प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि व्यक्तीस्वातंत्र्य आणि सरकार- जनता संबंधांसंदर्भातील चर्चेला तोंड फुटल्याचे म्हटले आहे.