पाकिस्तानातील लोक मोदींना देणार मत

बिहार – पंतप्रधानपद मोदींनाच मिळावे यासाठी पाकिस्तानात प्रार्थना सुरू आहेत हे सांगितले तर कदाचित ते कुणालाच खरे वाटणार नाही. मात्र ही बाब शंभर टक्के सत्य आहे. फरक इतकाच की हे पाकिस्तान म्हणजे आपले शेजारी राष्ट्र नसून बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील सिधिया पंचायतीखाली येणारे छोटेसे खेडे आहे. केवळ ३५ घरे असलेल्या या गावात २५० मतदार आहेत आणि त्या सर्वानी मोदींसाठी मत देणार असल्याचे जाहीरच केले आहे.पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने १५ एप्रिलच्या अंकात हे वृत्त मोदी वेव्ह इन इंडियाज पाकिस्तान या नावाने प्रामुख्याने छापले आहे.

या वृत्तपत्रात असेही छापले गेले आहे की भारतात निवडणुकांनंतर मोदी विजयी होऊन पंतप्रधान बनतील ही भीती पाकिस्तानला सतावत  असली तरी भारतातील पाकिस्तानात मात्र मोदीच विजयी व्हावेत यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांचा कोणताही प्रभाव या मतदारांवर नाही. मोदी पंतप्रधान बनले तर देशाची प्रगती वेगाने होईल, शेजारील उपद्रवी राष्ट्रांना मोदींचा वचक बसेल आणि देशात शांतता नांदेल असा येथील मतदारांना विश्वास वाटतो आहे.

या गावाचे नांव पाकिस्तान ठेवले गेले ते १९४७ सालात फाळणीनंतर पूर्व पाकिस्तानात गेलेल्या मुस्लीम बांधवांची आठवण म्हणून. आज या गावात एकही मुस्लीम नाही तर येथे संथाल आदिवासी लोकांची वस्ती आहे. गाव मागासलेले आहे तरीही मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या गावाचे नांव बदलावे यासाठी येथील ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही असेही समजते.

Leave a Comment