व्हीडीओतील आवाज माझा नाही – अजित पवार

पुणे – बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मते द्या अन्यथा गावाला पाणी मिळणार नाही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाने एकच गहजब माजला असताना व्हिडीओतील आवाज माझा नाही असा खुलासा अजित पवार यांनी केला असून त्यांना बदनाम करण्यासाठी आम आदमी पक्षाने हा बनाव रचल्याचा आरोप केला आहे.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या वेळी ग्रामस्थांना माझ्या बहिणीला मते दिली नाहीत तर गावाला पाणी मिळणार नाही. या गावाला माझ्या प्रयत्नांमुळे पाणी मिळाले आहे. ग्रामस्थ कुणाला मते देतात हे आम्हाला मतदान यंत्रांवर कळू शकणार आहे त्यामुळे तुम्ही मते दिली नाहीत तर पाणी मिळणार नाही असे वक्तव्य अजित पवार यांनी केल्याचे चित्रण मोबाईल फोनवरून करण्यात आले होते आणि नंतर ते प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे एकच गहजब माजला होता. मात्र हा प्रकार आपल्याला बदनाम करण्यासाठी आहे. आपला हा आवाजच नाही असा पवित्रा घेऊन अजित पवार यांनी आम पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार केली आहे.

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मतदारसंघातून दुसर्‍या वेळी लोकसभेसाठी निवडणूक लढवित आहेत. आजित पवारांच्या वादग्रस्त विधानावर शरद पवार यांनी अजितदादाची पाठराखण करताना ते असे कांहीही म्हणालेले नाहीत असे सांगितले आहे. मात्र बारामतीचा हा भाग उस उत्पादक शेतकर्‍यांचा असून दुष्काळग्रस्त भागात मोडतो. अजित पवार जलसंपदा मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातूनच  या भागाला पाणी पुरविले गेले आहे.

Leave a Comment