बलात्कारित महिलांनाही फासावर चढवा अबू आझमी यांची मुक्ताफळे

मुंबई – संमतीने अथवा संमतीशिवाय विवाहबाह्य शारीरिक संबंध हा इस्लाममध्ये अपराध असून त्याला देहदंड कथन करण्यात आला आहे. त्यामुळे संमतीने अथवा संमतीशिवाय ज्या महिलेचा विवाहपूर्व अथवा विवाहबाह्य शारीरिक संबंध आला असेल; तर त्यांना फासावर चढविणे आवश्यक आहे; अशी मुक्ताफळे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

सपचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी नुकतेच बलात्काराच्या आरोपींना फाशीसारखी कडक शिक्षा करू नये; असे विधान केले होते. मुलांकडून काही वेळा चुका होतात. मात्र त्यासाठी फाशीसारखी मोठी शिक्षा नसावी; असे यादव म्हणाले. याबाबत पत्रकारांनी आझमी यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ही मुक्ताफळे उधळली.    

सध्या भारतात संमतीने शारीरिक संबंध ठेवल्यास कायद्याचा अडसर नाही. मात्र त्याच व्यक्तीने नंतर तक्रार केल्यास संबंधित पुरुष अडचणीत येतो. महिलांवर मात्र काहीच कारवाई केली जात नाही. बलात्कार करणारा आनि बलात्कारित महिला अशा दोघांनाही फासावर लटकावले; तरच बलात्कारासारख्या लैंगिक अत्याचारांना आळा बसेल; असे त्यांनी सांगितले.

सपचे सर्वोच्च नेते मुलायमसिंग यादव यांना बलात्कारासाठी फाशीची शिक्षा मान्य नसल्याकडे आझमी यांचे लक्ष वेधले असता त्यांनी यावर मिळमिळीत भूमिका घेतली. यादव हे कोणत्या पार्श्‍वभूमीवर हे बोलले; हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. मात्र आपण इस्लामच्या विरोधात भूमिका घेणार नाही. इस्लामच्या तत्वानुसार व्यभिचार करणारा पुरुष आणि महिला हे दोघेही सारख्या प्रमाणात दोषी आहेत. त्या दोघांनाही देहदंड हीच शिक्षा आहे; असेही त्यांनी स्पष्ट केले.   

मात्र उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणारे आझमी यांचे  चिरंजीव फरहान आझमी हे मात्र आपल्या पित्याच्या भूमिकेशी सहमत नाहीत. बलात्काराच्या आरोपींना शंभरवेळा फाशी दिले पाहीजे; असे आपले मत असून आपल्याला पाच बहिणी आहेत. आपल्या भूमिकेशी आपले कुटुंबिय सहमत आहेत; असे त्यांनी सांगितले.