स्वागतार्ह टक्कावाढ

मतदानाचा टक्का वाढत चालला आहे. टक्क्यातली ही वाड भावनिक मुद्यावरून झालेली नाही. ती सातत्याने आणि क्रमाक्रमाने होत आहे आणि ती कायम राहील असे दिसत आहेे. खरे तर ही वाढ स्वागतार्ह आहे कारण कडक उन्हाळा असतानाही मतदानाची टक्केवारी ७० च्या पुढे जात आहे.  गेल्या काही दिवसांपासून मतदानाचे घटते प्रमाण ही चिंतेची बाब झाली होती. ती वाढावी यासाठी काय करता येईल यावर चर्चाही झडायला लागल्या होत्या.  पात्र मतदारांपैकी ४० किंवा ५० टक्केच मतदार मतदान करत असतील तर निवडून येणारे प्रतिनिधी हे खर्‍या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी असणार नाहीत आणि त्यातून निर्माण होणारे सरकार हे जनतेचे सरकार असणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याबाबत जोरकसपणे प्रयत्न सुरू केले. मतदान न करणार्‍यांना दंड ठोठवावा आणि मतदान सक्तीचे करावे असेही म्हणणारा एक वर्ग अजूनही समाजात आहे. त्यांचा प्रबोधनाने मतदानाची टक्केवारी वाढेल यावर विश्‍वास नाही. प्रत्यक्षात टक्केवारीत प्रबोधनानेच वाढ होत आहे. सक्तीचा विचार मांडणारे  विचारवंत खोटे पडले आहेत.अर्थात प्रबोधनांचा उपायसुध्दा उगाच यशस्वी होत नाही. 

त्यासाठी जनतेची मनःस्थितीसुध्दा अनुकूल असावी लागते. निदान आता तरी भारतातली जनता मतदान करण्याच्या मनःस्थिती आलेली आहे. लोकांची ही मनःस्थिती आणि सरकारसह काही स्वयंसेवी संघटनांनी केलेले प्रयत्न यांचा मेळ बसून  मतदान चांगले व्हायला लागले आहे. लोकांची मनःस्थिती का बदलली याचा विचार करावा लागेल. जेव्हा लोकांना परिवर्तन हवे असते आणि ते प्रचलित सरकारला धडा शिकवण्याच्या मनःस्थितीत येतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर मतदान करतात असा आजवरचा अनुभव आहे. १९७७ साली आणि ८० साली जनता अशीच अनुक्रमे इंदिरा गांधी आणि जनता पार्टी यांना धडा शिकवण्यास उत्सुक होती आणि  म्हणूनच त्यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली होती. जेव्हा भावनेच्या लाटा येतात तेव्हा मतदान जास्त होते. असे साधारण मानले जाते पण अलीकडच्या काळात सामान्य स्थितीतसुध्दा मतदानाची टक्केवारी वाढताना दिसत आहे.  ही सातत्याने पण हळूहळू होणारी वाढ आहे. तिच्यावरून कोणीही निकालाचे अंदाज बांधता कामा नयेत. कारण मात्र काही लोक तसा उपद्व्याप करतात. नागपूरमध्ये काल हा प्रकार घडला. नागपूरमध्ये २००९ पेक्षा जास्त मतदान नोंदले गेले. त्यावर नितीन गडकरी यांनी जादा मतदान म्हणजे आपलाच विजय असा दावा केला. 

त्यांचे प्रतिस्पर्धी विलास मुत्तेमवार यांनीही तसाच दावा केला आणि एवढेच नव्हे तर जादा मतदान म्हणजे आपण निवडूनच आलो आहोत असे गृहित धरून पेढेसुध्दा वाटले.  या दोघापैकी एकजण नक्कीच खोटा पडणार आहे. कारण एका मतदारसंघातले दोघे निवडून येत नसतात. एकंदरीत मतदान जास्त झाले की कमी झाले यावरून फार काही अंदाज करता येत नाही. वाढत चाललेले मतदान हा निरनिराळ्या घटनांचा परिणाम आहे. काही लोक मतदान करत नाहीत. उदासीन राहतात. सगळेच उमेदवार अपात्र आहेत असे त्यांचे म्हणणे असते. मग त्यातला कोणताही उमेदवार आपल्याला पसंत नसेल तर मतदान करायचे कोणाला, त्यापेक्षा घरी बसून राहिलेले बरे किंवा सहकुटुंब ट्रीपला गेलेले बरे असा या लोकांचा विचार असतो. ते अजिबात मतदान करत नाहीत. यावेळी मात्र अशा लोकांना मतदान करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मतदान करावयाच्या यंत्रावर उमेदवारांची नावे तर आहेतच पण यातला कोणताही उमेदवार पसंत नाही. असाही एक पर्याय त्यावर आहे. त्यामुळे त्यांचे मतदान वाढले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रसार माध्यमांमुळे विशेषतः टी. व्ही.मुळे राजकारणातल्या बातम्या, व्यक्ती, त्यांचे राजकारण, त्यांच्या सभा घराघरा पर्यंत पोहोचल्या आहेत. 

एरवी गावात एखादी जाहीर सभा झाली तर काही अपवाद वगळता त्या सभांना कोणी जात नाही आणि महिला तर अजिबात जात नाहीत. या लोकसंख्येचा पन्नास टक्के भाग असलेल्या महिलांना घरात बसून राजकारण बघायला मिळत आहे आणि त्यांना राजकारणात रस वाटायला लागला आहे. एकदा राजकारणात रस यायला लागला की आपले मत तयार होते आणि मत तयार झाले की मतदान आवर्जुन करावेसे वाटते. मतदान वाढण्याचे हेही एक कारण आहे. या महिलांना वाढत्या महागाईशी दररोज सामना करावा लागतो. त्यामुळे या जागृत झालेल्या महिला महागाई करणार्‍या सरकारला धडा शिकवायला उत्सुक झालेल्या आहेत आणि म्हणूनही मतदान वाढलेले आहे. निवडणूक आयोगाने मतदारांची नोंदणी शंभर टक्के व्हावी असाही एक प्रयत्न केलेला आहे. शिवाय लोकसुध्दा जास्तीत जास्त शिक्षित व्हायला लागले आहेत. या सगळ्या घटकांचा परिणाम होऊन मतदानाची टक्केवारी  वाढली आहे. या वाढलेल्या टक्केवारीमुळे भाजपाचा विजय होवो की कॉंग्रेसचा विजय होवो याच्याशी आपल्याला देणेघणे नाही. त्यामुळे लोकशाहीचा विजय मात्र नक्की होणार आहे. लोकशाही परिपक्व होत असल्याचे ते लक्षण आहे.

Leave a Comment