गद्दारी कराल तर हकालपट्टी

सांगवी ;पक्षाशी गद्दारी कराल तर खबरदार असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना -कार्यकर्त्यांना विजयकुमार गावित यांच्याप्रमाणे हकालपट्टी करू असा इशारा देत झाडाझडती घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार सांगवीमध्ये आले होते. यावेळी उमेदवार नार्वेकर यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, वनमंत्री पतंगराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आढाव, आमदार विलास लांडे, महापौर मोहिनी लांडे, माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, राज्याच्या ग्राहक कल्याण व सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष आझम पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, समन्वयक नानासाहेब शितोळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माऊली दाभाडे, मावळ तालुकाध्यक्ष बबन भेगडे आदी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी ज्यांनी कधी आयुष्यात शेकापचा झेंडा हातात घेतला नाही, शेकापची ध्येयधोरण माहीत नाहीत. अशांनी निवडणुकीच्या तोंडावर शेकापची उमेदवारी मिळविली ही मोठी गंमत आहे. अशा शब्दात लक्ष्मण जगताप यांच्यावर टीका केली . राष्ट्रवादीच्या जीवावर मोठे झालेल्या, प्रतिष्ठा मिळविलेल्या लक्ष्मण जगतापांनी पक्षाशी गद्दारी केली असून अशा लबाड, धोकेबाज, दगाबाजाला पराभूत करा, असे आवाहनही  त्यांनी केले.  

दिवसा एक, रात्री एक …. राष्ट्रवादीचे काही नगरसेवक दिवसा एकाचे  तर रात्री एकाचे  काम करतात, तर काही कार्यकर्ते प्रतिस्पर्धी  उमेदवारांच्या मागे-मागे फिरतात. हे मला दिसून आले आहे. ही लबाडी फार दिवस चालणार नाही. पक्षाने मोठे केले आहे. हे लक्षात ठेवा. पक्षाची भूमिका ठाम असून पक्ष शिस्त पाळलीच पाहिजे.असेही पवार म्हणाले