आयसीआयसीआय बँकेने पकडल्या १० कोटींच्या बनावट नोटा

लखनौ – आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड मध्ये असलेल्या विविध शाखांतून जमा करण्यात आलेल्या १० कोटी रूपयांपेक्षा अधिक मूल्याच्या बनावट नोटा पकडल्याची तक्रार लखनौ पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या नोटा गेल्या ८ वर्षात सापडल्या आहेत.

या विषयी माहिती देताना क्षेत्रीय प्रमुख मनीष पांडे म्हणाले की रिझर्व्ह बँकेच्या स्वच्छ नोटा धोरणाप्रमाणे आम्ही स्वच्छ व खर्‍या नोटाच ग्राहकांना देत आहोत. मात्र आमच्या उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील कांही शाखांतून गेल्या आठ वर्षात १० कोटी रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या बनावट नोटांचा भरणा केला गेल्याचे लक्षात आले. या नोटा २००६ ते २०१४ या कालावधीतील आहेत. एका महिन्यात ४ पर्यंत बनावट नोटा सापडल्या तर रिझर्व्ह बँकेला कळवावे लागते व हाच आकडा पाचच्या पुढे गेला तर पोलिसांत तक्रार दाखल करावी लागते त्याप्रमाणे आम्ही कृती केली आहे. आमच्या विविध शाखांत १० कोटी ७७ लाख रूपयांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांत एफआयआर दाखल केला गेला आहे.