मुशर्रफ यांना कराचीत हलविणार

इस्लामाबाद- देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपाचा सामना करत असलेले पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा त्यांच्या इस्लामाबाद येथील फार्महाऊसमधून कराचीतील नाविक दलाच्या रूग्णालयात पाठविले जाणार असल्याचे वृत्त आहे. ७० वर्षीय मुशर्रफ यांना पीएनएस शिफा च्या क्रिटीकल केअर युनिटमध्ये ठेवले जाणार आहे असे समजते.

मुशर्रफ यांच्या जीवाला इस्लामाबाद तसेच रावळपिंडीत धोका आहे. मुशर्रफ यांना हृदयरोगही आहे. त्यामुळे उपचाराची अत्याधुनिक सुविधा असलेल्या वरील रूग्णालयात त्यांना हलविले जात असल्याचे सांगितले जात आहे. या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे विशेष पथक तैनात केले गेले आहे तसेच त्यांच्या सुरक्षेचा बंदोबस्तही केला गेला आहे मुशर्रफ यांनीच उपचार घेण्यासाठी कराचीला पसंती दिली असल्याचेही वृत्त आहे.

मुशर्रफ यांचे वकील फारूग नसीम यांनी मात्र मुशर्रफ यांना कराचीला हलविले जाण्यासंबंधी कांहीही माहिती नसल्याचे सांगितले तर त्यांचे प्रवक्ते रजा बुखारी यांनी हे वृत्त फेटाळून लावताना मुशर्रफ यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या घरातच रावळपिडी सशस्त्र बल हृदयरोग संस्थानची उपग्रह सेवा दिली गेली असल्याचे सांगितले.