कुपोषणावर स्वस्त इलाज

भारतातल्या ४० टक्के जनतेला दोनवेळचे पोटभर अन्न मिळत नाही आणि या देशातली करोडो बालके कुपोषण होत असल्याने अनेक प्रकारच्या रोगांना बळी पडत आहेत. या लोकांना पोषण आहार द्यायचा असेल तर मोठा खर्च करावा लागेल, असे मानले जाते. कुपोषणाचा हा प्रश्‍न  आदिवासींमध्ये अधिक प्रमाणात आहे, असे सर्वसाधारणपणे समजले जाते. परंतु बिगर आदिवासींमध्ये सुद्धा एक छुपे कुपोषण आहे. पुणे जिल्ह्या तल्या काही महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीत हिमोग्लोबीनची कमतरता आढळली होती. आणि या माध्यमातून हे कुपोषण दिसून आले होते. हा प्रश्‍न गंभीर आहे. परंतु त्यावरचा इलाज ङ्गार अवघड नाही हे लक्षात आले. यातल्या काही मुला-मुलींना पूरक आहाराच्या गोळ्या देण्यात आल्या. काही मुलांना त्यांच्या घरातला स्वयंपाक आवर्जून लोखंडी भांड्यामध्ये करावा, असा सल्ला देण्यात आला. त्याशिवाय काही मुलांना सकाळी उठल्यानंतर मोजून १५ शेंगदाणे आणि थोडासा गूळ खाण्याचा सल्ला दिला. काही मुलांना काळी पेंडखजूर खायला दिली आणि साधारण तीन आठवड्यामध्ये या मुलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण ठिकाणावर आले. आदिवासींमध्ये सुद्धा कुपोषण कसे कमी करता येइलर् यावर बराच खल केला जातो. 

छत्तीसगडमध्ये काही स्वयंसेवी संघटनांनी शेताच्या बांधावर उगवणार्‍या आणि ङ्गुकट मिळणार्‍या अशा काही पालेभाज्या शोधून काढल्या आहेत की, त्यांच्या सेवनाने कुपोषण टळू शकते. अशीच एक वनस्पती आता चर्चेत आलेली आहे. मेक्सिकोमध्ये या वनस्पतीचा वापर पोषण आहारामध्ये आवर्जून केला जात असतो. स्पायरुलिना या नावाची ही वनस्पती भारतात सुद्धा कुपोषणाचा प्रश्‍न सोडवण्यास उपयुक्त ठरू शकेल, असे लक्षात यायला लागले आहे. गोड्या पाण्यावर उगवणारी ही वनस्पती प्रथिने आणि एन्झाईन्स यांनी युक्त असते. त्याच बरोबर तिच्यामध्ये उष्मांक आणि चरबी कमी असते. तिच्यातील प्रथिनांच्या भरपूर मोठ्या प्रमाणामुळे तिचा उल्लेख प्रथिनसमृद्ध वनस्पती म्हणून केला जातो आणि अवकाशात जाणार्‍या अवकाश यात्रींना दिल्या जाणार्‍या अन्नामध्ये या वनस्पतीचा मुबलकपणे वापर केला जातो. 

भारतातील काही विद्यार्थ्यांवर या वनस्पतींचा प्रयोग करण्यात आला. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये स्पायरुलीना पासून तयार केलेले काही प्रक्रियायुक्त पदार्थ मुलांना खायला देण्यात आले. दोन ते पाच वर्षे वयोगटातल्या दोन हजार मुलांना हा आहार दिला आणि अशा प्रकारचा आहार न मिळणार्‍या मुलांच्या वाढीशी त्यांची तुलना करण्यात आली. तेव्हा ही स्पायरुलीना बॉईज् ऍन्ड स्पायरुलीना गर्ल्स यांची जोमदार वाढ होत आहे, असे लक्षात आले. या प्रयोगावरून तरी भारतातल्या कुपोषणावर स्पायरुलीना उपयुक्त ठरू शकेल, असे वाटायला लागले आहे.

Leave a Comment