भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभांना मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून युतीतील अन्य पक्षांना मोदींच्या सभेची गरज भासू लागली असल्याचे चित्र आहे. महायुतीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघाचे राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रात मोदींची सभा हवीच यासाठी भाजपला पत्र लिहिले असून बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात असलेले महादेव जानकर यांनीही मोदींच्या सभेसाठी आग्रह धरला असल्याचे समजते. अर्थात मोदींच्या पूर्वनियोजित सभांतून कसा वेळ मिळतो हे पाहून या सभा ठरविल्या जाणार आहेत.
महायुतीत सध्या सहा पक्षांची युती असली तरी सेना भाजप सोडता अन्य पक्षांकडे स्टार प्रचारकांची उणीव आहे. शेट्टी हातकणंगले येथून तर सदाभाऊ खोत हे शरद पवारांच्या माढा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ आहे. तसेच बारामती तर राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच आहे. साखर कारखान्यांची रेलचेल असलेल्या या भागात कृषी समस्या मोठ्या आहेत. त्यामुळे मोदी यांनी या भागात सभा घ्याव्यात असा आग्रह संबंधित उमेदवार करत आहेत. मोदींची जादू मतदारांवर नककीच परिणाम करेल असा विश्वास ही नेतेमंडळी व्यक्त करत आहेत.