निवडणुकीच्या प्रचारात लहान बालकांच्या वापराविरोधात निवडणूक आयोगाचे आदेश

पुणे  – निवडणुकीच्या प्रचारासाठी वा निवडणुकीसंदर्भात लहान बालकांचा वापर करू नये यासाठी पुण्यातील ज्ञानदेवी संचलित चाईल्डलाईनने निवडणुक आयोगाला केलेली विनंती मुख्य निवडणुक आयोगाने मंगळवारच्या बैठकीत मान्य केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पक्ष प्रचारासाठी लहान बालकांचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती चाइल्डलाईनच्या प्रमुख डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी दिली. 

डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, चाईल्डलाईन व ज्ञानदेवीच्या शाळेतील बालसेना उपक्रमामुळे लहान मुलांना उमेदवार निवडणुक प्रचारासाठी जुंपण्यात येत असल्याचे लक्षात आले होते. थोडे पैसे देऊन त्यांच्याकडून हे काम करण्यात येते.  मुख्यत्वेकरून झोपडपट्टी व आर्थिक निम्न स्तरातील बालक यात गुंतविण्यात येतात. पक्ष प्रचाराचे काम हे नुसते बालकामगार या व्याख्येत मोडत नाही तर त्यांच्या अभ्यास आणि आरोग्यवरही परिणाम करणारे आहे. अहोरात्र फिरल्याने शाळेतील उपस्थितीवरही आणि त्यांच्या मानिसकेवरही परिणाम करणारा प्रकार आहे. 

प्रत्येक शहरात ही चाईल्डलाईन सिटी ऍडव्हायझरी बोर्डच्या सहकार्याने कार्यन्वित होते. यामध्ये विविध विभागाचे प्रतिनिधी असतात. यामुळे सिटी ऍडव्हायझरी बोर्डाच्या बैठकीत निवडणूक आयोगाला या संदर्भात निर्बध घालावीत असे विनंती पत्र ज्ञानदेवी संचलित चाईल्डलाईनने करण्याचे ठरले. चाईल्डलाईनने पत्र लिहून पक्षप्रचार किंवा निवडणुकीसंदर्भात कामात लहान मुलांचा वापर थांबविण्यासंदर्भात सूचना देण्यात यावेत असे पत्र निवडणुक आयोगाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांना लिहीले होते. त्यासंदर्भात निवडणुक आयोगाने लहान मुलांच्या पक्ष प्रचाराच्या वापरास मनाई केली आहे. अशी माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली.