टाळाटाळ करणाऱ्या ट्रव्हल्स कंपनीने भरपाईचे ग्राहक मंचाचे आदेश

पुणे,  – नियोजित सहल रद्द करून भरलेले पैसे देण्यास एखादी ट्रव्हल्स कंपनी टाळाटाळ करत असल्यास घाबरण्याचे मुळीच कारण नाही. ग्राहक त्या विरोधात ग्राहक मंचात दाद मागू शकतात. अशाच एका प्रकरणात निकालाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आत भरलेले 30 हजार रुपये देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे. शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी 5 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 2 हजार रुपये देण्यात यावेत, असेही अध्यक्ष व्ही.पी.उत्पात आणि सदस्य गीता घाटगे यांनी आदेशात नमुद केले आहे. 

याबाबत गौतम दत्तात्रय साळुंके (रा. हडपसर) यांनी सचिन ट्रॅव्हल्स लि. शिवाजीनगर, सचिन ट्रॅव्हल्स लि. मुंबई, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन जकातदार, संचालक सोनाली जकातदार आणि शुभदा जकातदार यांच्याविरोधात 6 जुलै 2013 रोजी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. साळुंके आर्थोपॅडिक सर्जन आहेत. त्यांना कुटुंबियांसोबत केरळ, कन्याकुमारी येथे सहलीसाठी जायचे होते. त्यावेळी साळुंके यांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधला.

सहलीसाठी तीन जागांची बुकींग केली. दि. 14 ते 23 मे 2013 या कालावधीत सहल जाणार होती. त्यासाठीचे 3 जानेवारी 2013 रोजी 30 हजार रुपये धनादेशाद्वारे भरले. त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी साळुंके यांना कंपनीच्या कार्यालयातून फोन आला. केरळ, कन्याकुमारी येथे जाणारी ट्रीप कंपनीने रद्द केली असून, तुम्ही भरलेले पैसे लवकरच माघारी देण्यात येतील, असे आश्वाजसनही यावेळी देण्यात आले. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी कंपनीने साळुंके यांना धनादेश दिला. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो धनादेश बाऊन्स झाला. त्यानंतर आणखी एकदा कंपनीच्या वतीने धनादेश देण्यात आला. तो धनादेशही बाऊन्स झाला. त्यानंतर साळुके यांनी कंपनीला नोटीस बजावली. मात्र, कंपनीकडून त्यालाही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे साळुंके यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. 

भरलेले 30 हजार, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी 50 हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 20 हजार रुपये मिळावेत, अशी मागणी ग्राहक मंचात केली. नोटीस पाठवूनही कंपनीच्या वतीने कोणीही मंचात हजर राहिले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या बाजूच्या युक्तीवादानंतर मंचाने वरील आदेश दिला आहे.

Leave a Comment