मुंबई- मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेनी सभागृहनेते यशोधर फणसे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी पाचव्यांदा अध्यक्ष बनण्याचे राहुल शेवाळेंचे स्वप्न भंगले आहे. स्थायी समिती अध्यक्षपदी शेवाळेंची वर्णी लागणार, हे निश्चित असतानाच अचानक ‘मातोश्री’वरून शेवटच्या क्षणाला सभागृहनेते यशोधर फणसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
गेल्याक काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळात पडणार याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
सध्याचे स्थायीचे सभापती राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेला शिवसेनेने पूर्णविराम देत चक्क सभागृहनेते यशोधर फणसे यांचे नाव पुढे केले. त्याप्रमाणे फणसे यांनी अध्यक्षपदासाठी महापालिका चिटणीस नारायण पठाडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पश्चिम उपनगरातील अंधेरी-वर्सोवाचे नगरसेवक यशोधर फणसे यांना उमेदवारी देत शिवसेनेने पुन्हा एकदा पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नगरसेवकांचाच मान राखला आहे. मागील दहा ते अकरा वर्षात शहरातील एकाही नगरसेवकाला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिलेले नाही. २००२-२००३मध्ये दादरमधील नगरसेवक सदा सरवणकर यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले होते. परंतु त्यानंतर दोन वेळा दत्ता दळवी, दोन वेळा सुनील प्रभू, चार वेळा रवींद्र वायकर आणि चार वेळा राहुल शेवाळे यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. शेवाळे हे खासदारकीचे उमेदवार असल्यामुळे खासदार बनल्यावर त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली नसल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.