माढातील लढत दोन मोहिते पाटलांमुळे रंगणा : दोघांचे भांडण तिस-याचा……होणार का!

सोलापूर जिल्ह्यातील दोन लोकसभेचे मतदारसंघ हे पुर्नरचनेत कायम राहिले आहेत आणि दोन्ही मतदार संघ खुले झाल्याने अनेकांच्या आशा आकांक्षा उंचावल्या आहेत. यापूर्वी सोलापूर मतदारसंघ खुला तर पंढरपूर मतदारसंघ राखीव होता. त्यामुळे अकलूजच्या मोहितेपाटील यांना पंढरपूर मतदारसंघावर हक्क कधीच सांगता आला नाही.

तसा हक्का सांगण्याची संधी पहिल्यांदा आली तेव्हा पवारसाहेब पुढे आले आणि त्यांनी संधी हिरावून घेतली. यावेळी जरी विजयसिंह मोहिते पाटील यांना मानसन्मानाने उमेदवारी दिली असली तरी त्यांचेच बंधू प्रतापसिंह अपक्ष म्हणून उतरले असल्याने दोन मोहितेपाटलांमुळे माढाची लढत लक्षवेधी ठरणार आहे. पण या लढतीचा फायदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाशिवभाऊ खोत यांना मिळणार का हाच उत्सुकतेचा विषय आहे.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार यांनी स्वत:साठी माढा मतदारसंघाची निवड केली. त्याला विजयसिंह मोहितेपाटील यांनी होकार दिला अन ते माढातून निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र विजयसिंह मोहितेपाटील यांना पराभव पत्करावा लागला तोही अपक्ष आमदारांकडून. याचा राग मोहितेपाटील समर्थकांच्यात होता. त्यामुळे यावेळी ते पवारसाहेबांची उमेदवार म्हणून वाटच बघत होते. हा राग ओळखूनच पवारांनी गपचूपपणे हा मतदारसंघ विजयसिंह मोहितेपाटील यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारीसह परत दिला.

सोलापूर जिल्ह्यात मोहितेपाटील घराण्याचे वर्चस्व गेली अनेक दशके आहे. प्रत्येक गावात मोहितेपाटील कुटुंबाला मानणारी अनेकजण आहेत. तेथे तरूणांचे प्रतापसिंह मोहितेपाटील यांच्या नावाची संघटनाही आहे. साखर कारखाना, दुध संघ अशा सर्व सहकारी संस्था मोहितेपाटील यांच्याकडे आहेत. त्यामुळेच प्रत्येक गावागावात मोहितेपाटील घराण्याचा झेंडा दिसतो.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जरी सोलापूर जिल्ह्यातील असले तरी त्यांचे वर्चस्व सोलापूर शहर आणि आजूबाजूपुरतेच मर्यादित आहे. त्यांनाही लोकसभेसाठी मोहितेपाटील यांचीच मदत घ्यावी लागते हा वस्तूस्थिती आहे. निवडून गेल्यावर शिंदे हे सोलापूरकडे कधीच फिरकत नाहीत. अधूनमधून कधीतरी येतात. त्यांचे कुटुंबिय हे मुंबईतच स्थायिक झाले आहेत. त्यांची कन्या प्रणेती शिंदे हिलाही सोलापूरकरांनी आमदार म्हणून विधानसभेत पाठवले पण तिचाही तोच संपर्काचा प्रॉब्लेम आहे.

मागच्या निवडणुकीत शिंदे हे केवळ पवार माढामध्ये आले म्हणूनच बचावले तर यावेळी खुद्द मोहितेपाटीलच आले असल्याने त्यांचे सितारे बुलंद झाले आहेत. पण माढामध्ये राजू शेट्टींचे कट्टर समर्थक सदाशिव खोत यांना उमेदवारी महायुतीने दिली आहे. त्यांचेही नाव शेतक-यांसाठी संघर्ष करणारे शेतकरी म्हणूनच परिचित आहे. त्यामुळेच माढाची जागा भाजपची असूनही ती शेट्टी यांनी सदाभाऊंसाठी मागून घेतली. यावेळी दोन मोहितेपाटील बंधूंच्यातील लढतीत तिस-या सदाभाऊंच्या पदरात काय पडणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वी दोनतीनवेळा सोलापूरची जागा भाजपने जिंकलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप, सेना आणि यावेळी त्यांना आरपीआयची साथ असल्याने सदाभाऊंही या तिरंगी लढतील कमकूवत उमेदवार राहिलेले नाहीत. पूर्वीच्या राखीव असलेल्या पंढरपूर मतदारसंघात माढा येत असल्याने येथे त्यांना आरपीआयची चांगली मदत होऊ शकते.

 

Leave a Comment