खडाजंगीचा लाभ कोणाला?

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीला पराभव पत्करावा लागेल असे संकेत मिळाले आहेत. अर्थात, हा पराभव शिवसेना, भाजपा आदी विरोधी पक्षांनी घडवून आणायचा आहे. मात्र या महायुतीच्या नेत्यांनी नियोजनबध्दपणे आघाडीच्या वाईट कारभारावर नीट प्रकाश टाकला नाही तर कॉंग्रेसचा पराभव टळू शकतो आणि चित्र बदलू शकते. हे सारे कळत असतानाही आज ठाकरे बंधू परस्परांवर विषारी शब्दांनी हल्ला करत आहेत. त्यांच्या हल्ल्यामुळे निवडणुकीतले मूळ प्रश्‍न बाजूला पडले आहेत आणि याला त्या दोघांचाही अहंकार कारणीभूत आहे. राजकारणात दोन पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद असणे स्वाभाविकच असते. परंतु ते मतभेद किती ताणायचे आणि त्या मतभेदापायी आपले स्वतःचे किती नुकसान करून घ्यायचे यालाही काही मर्यादा असते. शहाण्या माणसांना ती मर्यादा कळते. परंतु जो माणूस अहंकाराच्या आहारी जातो त्याला ही मर्यादा कळत नाही. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांच्यातील मतभेद असेच टोकाला गेलेले आहेत. या मतभेदातून मुंडे आणि अजित पवार हे एकमेकांवर मोठ्या कटुतेने शाब्दिक वार करत असतात. परंतु शरद पवार शहाणे आहेत. ते कधीही मुंडेंना त्यांच्या शब्दात उत्तर देत नाहीत. मुंडे यांना मात्र मतभेद किती ताणावेत याचे भान नाही. 

उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये असलेली तेढ कमी होणे दोघांच्याही हिताचे आहे. हे दोघांनाही कळते. पण तरीही केवळ अहंकारापोटी या दोघांनी परस्परांवर एवढे हल्ले सुरू केले आहेत की या दोघांनाही भान राहिलेले नाही. आपण न भांडता एकत्र आलो तर महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवू शकतो हे दोघांनाही कळते पण त्यांनी आपापसात संघर्ष करून कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा फायदा करून देण्यास सुरूवात केली आहे. निवडणूकपूर्व मतदार सर्वेक्षणांमध्ये आघाडीचा दारूण पराभव होईल असे संकेत मिळाले आहेत.  या सर्वेक्षणाचा शरद पवार यांनी धसका घेतला आहे. परंतु वरवर तसे न दाखवता त्यांनी हे सर्वेक्षणातले निष्कर्ष खोटे ठरवण्यासाठी कंबर कसली आहे. आता निवडणुका घेतल्यास राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांचा पराभव अटळ आहे. परंतु तरीसुध्दा आपण येत्या दोन-तीन आठवड्यात वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे या दृष्टीने  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्री. शरद पवार यांनी शिवसेना आणि मनसे यांच्यातील मतभेदांवर रॉकेल टाकायला सुरूवात केली आहे. 

त्यांनी काल माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले आणि हे ठाकरे बंधू  परस्परांवर शाब्दिक हल्ले करतील अशी तरतूद केली. पवारांनी उध्दव ठाकरे यांना अपरिपक्व नेता म्हटले.  पण जाता जाता त्यांनी राज ठाकरे यांची प्रशंसा केली. त्यातून आता या दोन भावातच खडाजंगी सुरू आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्याच्या मुद्यावरून महायुतीत संघर्ष सुरू आहेच. खरे म्हणजे मनसे महायुतीत येणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर हा संघर्ष थांबायला हवा होता आणि शिवसेनेच्या तोफांचे लक्ष्य महाराष्ट्रातले सरकार हे व्हायला हवे होते. पण दुर्दैवाने राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे परस्परांच्या विरोधात तोफा डागायला लागले आहेत. दोन दिवसांपासून झालेल्या राज ठाकरे यांच्या सभा आणि काल झालेली उध्दव ठाकरे यांची सभा ऐकली तर शिवसेना हा कॉंग्रेसच्या विरोधातला पक्ष आहे की राज ठाकरे यांच्या विरोधातला पक्ष आहे. हेच लक्षात येत नाही. कारण उध्दव ठाकरे यांची ही सारी सभा   बाळासाहेबांचे स्मारक, त्यासाठीचा भूखंड आणि बाळासाहेबांची राज ठाकरे यांनी केलेली उपेक्षा याच विषयाला वाहिलेली दिसते. 

ठाकरे कुटुंबामध्ये परस्परांना बोचकारणे, शाब्दिक हल्ल्यांनी घायाळ करणे, घणाघाती आरोप करणे, आव्हाने आणि प्रतिआव्हाने देणे या गोष्टींसाठी आवश्यक असलेले कौशल्य भरपूर आहे. त्यामुळे राज आणि उध्दव ठाकरे यांच्यातला हा कलगीतुरा अजूनही काही दिवस जारी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे हट्टाला पेटून शिवसेनेचे अधिकाधिक नुकसान कसे करता येईल यासाठी आपली सारी शक्ती पणाला लावणार आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातील मतदानाची तारीख जवळ आली असताना उध्दव ठाकरे यांची तलवार राज्य शासनाचे वाभाडे  काढण्यासाठी चालण्याच्याऐवजी राज ठाकरे यांचे वाभाडे काढण्यासाठी चालणार आहे आणि राज ठाकरेसुध्दा त्याच त्वेषाने आपल्या भावावर घणाघाती हल्ले करणार आहेत. या दोघांचे हे जबरदस्त वाक्युध्द चालले असताना शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या चेहर्‍यावर अनेक स्मितरेषा उमटत आहेत. कारण गेली पाच वर्षे त्यांच्या सरकारने जो दुःशासनाचा नमुना पेश केला त्याच्यावरचे लक्ष विचलित होत आहे. निवडणुकीच्या मैदानात शिवसेना आणि भाजपा यांच्याकडून ज्या मुद्यांच्या आधारे सरकारचा पंचनामा करणे अपेक्षित होते ते मुद्दे बाजूला पडत आहेत. पवार आणि चव्हाण यांना हेच हवे आहे. किंबहुना ते तसे व्हावे यासाठीच शरद पवारांनी या दोघांत छान भांडण लावून दिलेले आहे आणि त्यांच्या या डावाच्या जाळ्यात शिवसेना आणि मनसेचे हे दोन वाघ अलगदपणे सापडले आहेत.

Leave a Comment