साताराची गादी ना राष्ट्रवादीची ना काँग्रेसची ती राजांचीच

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीने ही जागा रिपब्लीकन पक्षासाठी सोडलेली असून आरपीआयमध्येही उमेदवाराबाबत घोळ सुरू आहे. कसेही झाले तरी येथून उदयनराजे निवडून येणार हे नक्की. पण तो विजय राष्ट्रवादीचा नसेल. कारण सातारची गादी ना राष्ट्रवादीची आहे ना काँग्रेसची, ही गादी उदयनराजे यांचीच आहे. ते ज्या पक्षातून निवडूक लढवतील तो पक्ष तिथे जिंकेल अशीच येथील परिस्थिती आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी सातारा मतदारसंघातून तिकीट मागितले होते. पण ते देण्याला शरद पवार तयार नव्हते. कारण ते स्वत: साठी मतदारसंघ निवडण्यात गर्क होते. त्याचवेळी उदयनराजे यांनी माढातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. या बातमीने पवारांच्या पायाखालची वाळूच घसरली. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी जाहीर कऱण्यापूर्वीच उदयनराजे यांची सातारातून उमेदवारी जाहीर केली होती. हा इतिहास फार जुना नाही तर पाचच वर्षापूर्वीचा आहे.

यावेळी सातारा मतदारसंघातून रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याचे शरद पवार यांच्या मनात होते. त्यांनी रामराजे यांना तशी तयारीही करायला सांगितली होती. हे समजतात त्याच दरम्यान उदयनराजे अन्य पक्षाकडून उभे रहाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्यने रामराजे यांनी तयारी थांबवली, कारण त्यांची उदयनराजे याच्या विरोधात लढण्याची तयारी नव्हती. पण उदयनराजे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली. त्याला प्रतिसाद मिळत नाही असे बघून त्यांनी अन्य पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्यामुळे केवळ या संकेतांना घाबरूनच राष्ट्रवादीच्या पहिल्याच यादीत उदयनराजे यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नावावर पहिली सीट नक्की झाली आहे.