शूमाकर वर घरीच होणार उपचार

सात वेळा फॉर्म्युला वन रेस जिंकणारा मायकेल शूमाकर कोमातून बाहेर पडण्याची शक्यता नसल्याचे त्याच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी शूमाकर याची पत्नी कोरिना हिला सांगितल्यानंतर त्याच्यासाठी घरातच १०० कोटी रूपये खर्चून कोरिनाने घरातच मेडिकल रूम सज्ज केली असल्याचे वृत्त आहे.

तीन महिन्यांपूर्वी म्हणजे २९ डिसेंबरला फ्रान्समधील आल्प्स पर्वतराजीत स्कीईंग करताना मायकेलला अपघात होऊन त्याच्या डोक्याला इजा झाली आहे. तेव्हापासून तो कोमात आहे. ग्रेनोबेल रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र त्याच्या तब्येतील सुधारणा नाही. मायकेल कदाचित कधीच कोमातून बाहेर येऊ शकणार नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या स्वित्झर्लंड येथील लेक जेनेवा बंगल्यात त्याची पत्नी कोरिना हिने अत्याधुनिक मशीन्ससह स्पेशल रूम तयार केली असून ही मशीन्सच आता मायकेलला जिवंत ठेवणार आहेत.

शूमाकर कुटुंबावर सध्या फार वाईट वेळ आली आहे मात्र जगभरातील मायकेलचे फॅन्स त्याच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचे कोरिनाने सांगितले आहे.