अंतुले सुनील तटकरेंच्या पराभवासाठी सज्ज

मुंबई -रायगड मतदारसंघातून चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेले काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले  या मतदारसंघातून लोकसभेसाठी उमे असलेल्या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या पराभवासाठी सज्ज झाले असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे तटकरे यांना अंतुले यांनीच राजकारणात आणले आहे. म्हणजे रायगड मध्ये यंदा गुरूशिष्य सामना रंगणार आहे.

मराठा समाजाचे वर्चस्व असणार्‍या या मतदारसंघातून महाराष्ट्रच्या मुख्यमंत्रीपदावर गेलेले अंतुले हे एकमेव नेते आहेत. अंतुले यांना यंदा लोकसभेचे तिकीट मिळालेले नाहीच पण त्यांचा मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीकडे दिला आहे. राज्याच्या राजकारणातून दूर झाल्यापासून म्हणजे १९८९ पासून ते या मतदारसंघातून ४ वेळा विजयी तर ३ वेळा पराभूत झाले आहेत. त्यांच्या पराभवास दोन कारणे होती.एक म्हणजे मतदारसंघ फेररचनेत या मतदारसंघाचा मोठा भाग मावळ मतदारसंघात आला आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याबद्दल अंतुले यांनी केलेली वादग्रस्त विधाने.

यंदा काँग्रेसने मावळ व रायगड हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे दिले आहेत. रायगडमधून जलसंपदा मंत्री सुनील तटकरे तर मावळ मधून शिवसेनेतून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले राहुल नार्वेकर हे उमेदवार आहेत. अंतुले यांनी तटकरे यांचा पराभव करण्याचा चंग बांधला असून अंतुले यांची नाराजी तटकरे यांना चांगलीच महागात पडू शकते असेही सांगितले जात आहे.