कॉग्रेसचे ४० ‘स्टार’ मंडळी करणार प्रचार

मुंबई- लोकसभा निवडणुकीमुळे सध्या सर्वत्र वातावरण निवडणूकामय झाले आहे. त्यामुळे प्रत्येकांना या निवडणुकीची उत्सुकता लागली आहे. या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी विविध पक्षांनी राज्यभरातून ‘स्टार’ प्रचारक म्हणून २६६ जणांची यादी निवडणूक आयोगाला दिली असून अर्ध्याहून अधिक जणांची नावे जनतेला परिचितही नाहीत. काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी देत महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप, माकप पक्षांसह शिवसेना, मनसे, आप, रिपाइं आदी पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यातील नऊ पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे दिली आहे. २६६ जणांच्या यादीत बहुतेक नावे लोकांच्या परिचयाची नाहीत. काँग्रेसने ४० जणांची स्टार प्रचारक म्हणून नावे दिली असून,काँग्रेसने दिलेल्या स्टार प्रचारकांमध्ये सर्व प्रचारक जनतेच्या परिचयाचे असल्याने त्याचा निश्चितच पक्षाला लाभ होऊ शकतो.

त्या सोबतच या यादीत आता राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ जणांची नावे स्टार प्रचारक म्हणून दिली आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या यादीतील ६४ टक्के प्रचारकच लोकांना परिचित आहेत. तर भाजपने ४० जणांची नावे दिली असून, त्यातील ८० टक्के प्रचारकच लोकांना परिचयाचे आहेत. शिवसेनेच्या ३४ जणांच्या यादीत केवळ आठ जणच स्टार प्रचारक म्हणून लोकांना परिचित आहेत. मनसेने स्टार प्रचारक म्हणून २७ जणांची नावे दिली असून त्यातील केवळ १७ टक्के नावे लोकांना परिचित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
त्यामुळे या स्टार प्रचारकाच्या यादीत सध्या तर कॉग्रेसने आघाडी घेतली आहे.