ताज्या मतदार सर्वेक्षणात रा.लो. आघाडीवर

मुंबई – निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तसे मतदार सर्वेक्षणाचे नवे निष्कर्ष लोकांसमोर यायला लागले आहेत. एबीपी न्यूज आणि निल्सन् यांनी संयुक्तरित्या केलेल्या ९ ते १६ मार्च दरम्यानच्या सर्वेक्षणात भारतीय जनता पार्टी प्रणित रा.लो. आघाडीचेच वर्चस्व असल्याचे लक्षात आले आहे. या सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पार्टीला २०९ जागा मिळतील आणि रा.लो. आघाडीच्या अन्य घटकांच्या जागा मिळून ही संख्या २३३ वर जाईल.

भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत सिद्ध करण्यासाठी ४० जागा कमी पडतील असा अंदाज आहे. पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार म्हणून ५४ टक्के मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला तर १८ टक्के मतदारांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे. या सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार कॉंग्रेस प्रणित यू.पी.ए. आघाडीला ११९ जागा मिळतील. त्यातील ९१ जागा कॉंग्रेसच्या असतील आणि उर्वरित २८ जागा घटक पक्षांच्या असतील.

आम आदमी पार्टीला या निवडणुकीत चार जागा मिळतील असा अंदाज आहे. बीएसपी १७, समाजवादी पार्टीला १२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. डाव्या आघाडीला या निवडणुकीत २८ जागा मिळतील असा या पाहणीचा निष्कर्ष आहे. तिसरी आघाडी म्हणवल्या जाणार्‍या सर्व पक्षांना मिळून १६८ जागा मिळतील, असा अंदाज आहे.