मुलींनाही मिळतोय राजकारण आणि सत्तेत वारसा

मुंबई – भारतीय परंपरेप्रमाणे आजपर्यंत वडीलांची सत्ता आणि अधिकार मुलकडे दिले जाण्याची प्रथा होती मात्र त्यात आता निश्चत बदल होत असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. सत्तेच्या चाव्या मुलींकडे अधिक आत्मविश्वासाने सोपविल्या जात असल्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकली असता दिसून येत आहे.

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया यांनी वडिलांची बारामतीची जागा यशस्वीपणे राखली असतानाच त्यांच्या कडे भविष्यात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणूनही पाहिले जात आहे. भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम उत्तर पूर्व मुंबईतून निवडणुक रिंगणात आहेत तर सुशीलकुमार शिदे यांची कन्या प्रणिती आमदार आहे. त्यांच्यासाठीही लोकसभेचे दरवाजे लवकरच खुले होतील असे सांगितले जात आहे.

पाच वेळा उत्तरपश्चिम मुंबईतून खासदार झालेले दिवंगत नेते सुनीलदत्त यांच्या कन्या प्रिया दत्त याही यशस्वी खासदार आहेत. माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे या विधानपरिदेषेचे सदस्य ना.ह.कुंभारे यांच्या कन्या आहेत. यवतमाळचे माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांच्या कन्या भावना , प्रभा राव यांच्या कन्या चारूलता टोकस याही राजकारणात आपले यश चाखत आहेत. खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा महाराष्ट्र सरकारमध्ये बाल, महिला कल्याण मंत्री आहेत. कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्या कन्या रोजा याही महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत.

भाजपचे वरीष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा आमदार आहेत तर आमदार भैय्या ठाकूर यांच्या कन्या यशोमती राहुल गांधी यांच्या युवार ब्रिगेडमध्ये सामील आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कन्या स्मिता व विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना याही राजकारणाच्या उंबरठ्यावर आहेत.

महिलांना मिळालेले ५० टक्के आरक्षण यामुळेही राजकारणातील महिलांची संख्या वाढती आहेच पण वडिलांकडूनही राजकारणाचा वारसा त्या हक्काने मिळवत आहेत असे म्हटले तर गैर ठरू नये.

Leave a Comment