मनसेच्या ‘राज’नीतीमुळे पुन्हा एकदा वादळ

मुंबई- यावेळेसच्या लोकसभा निवडणूकीत मनसेने मोजक्याच जागा लढविण्याचे ठरवले आहे असे दिसते. त्यामुळेच त्यांनी केवळ आतापर्यंत मोजकेच उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा करिष्म़यामुळे लोकसभेच्या निवडक जागा लढवून यश मिळविण्याच्या ‘राज’नीतीमुळे यंदाही लोकसभा निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा वादळ निर्माण करणार असे दिसत आहे.

राज ठाकरे आगामी काळात प्रचाराची पहिली सभा पुण्यात घेऊन प्रचाराची तोफ डागतील. आठ वर्षांचा पक्ष आणि लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील अनुभवाच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त जागा लढवतील असा अंदाज होता. पण या समजाला छेद देत यावेळीही निवडक जागा लढवून शिवसेनेला दणका देण्याची तयारी करत लोकसभेत खाते उघडण्याची तयारी राज यांनी चालवली आहे. त्यामुळे मनसेचे उमेदवार असलेल्या लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी किमान तीन सभा घेण्याची तयारी राज ठाकरे यांनी सुरू केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहाही जागा लढवताना मनसेने तीन महिला उमेदवार दिले होते तर महाराष्ट्रात एकूण पाच महिलांना उमेदवारी दिली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने लोकसभेच्या बारा जागा लढविल्या होत्या तर यावेळी अद्यापि एकही महिला उमेदवार जाहीर केलेला नसून दहा जागांवर उमेदवारी घोषित केली आहे.

उत्तर मुंबईत मनसेचा एक आमदार तर ईशान्य मुंबईत तीन आमदार असूनही येथून मनसेने एकही उमेदवार न दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पण पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याच्या राज यांच्या रणनीतीचाच हा एक भाग असल्याचे पक्षाच्या पदाधिका-याचे म्हणणे आहे. पुणे येथे मनसेचे खंदे सरचिटणीस दीपक पायगुडे यांना उमेदवारी देऊन ३१ मार्च रोजी पुण्यातून प्रचाराची पहिली सभा राज घेणार आहेत. पुण्यातील नदीपात्रात होणा-या या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीच्या कारभाराचे वाभाडे ते काढतील, असेही सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment