पक्षांतराचे सत्र

महाराष्ट्रात पवार आणि मुंडे कुटुंबियांचा उभा दावा तयार झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय यांना पवारांनी फोडले आणि राष्ट्रवादीत आणले आणि त्यामुळे मुंडेंनी राष्ट्रवादीत मोठी फाटाफूट घडवण्याची प्रतिज्ञा केली. पवारांनी भाजपातला एक नेता फोडला तर आम्ही त्यांचे चार नेते फोडू असा पण करून मुंडे कामाला लागले.  त्यांनी तर राष्ट्रवादीचे बरेच नेते फोडले पण पवारांनी आपल्या पक्षाचे बळ वाढवण्यासाठी अनेक ठिकाणहून विशेषत: शिवसेनेतून अनेक नेते आयात केले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तर तिच्यात आयात उमेदवारांचा मोठा भरणा दिसून येतो. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाराष्ट्रातली अवस्था फार काही चांगली नाही असे लक्षात येतेे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी कोणाला किती जागा मिळाव्यात यावरून प्रदीर्घ काळ संघर्ष होत आला. हे जागा वाटपाचे सूत्र २२-२६ असावे की २३-२५ असावे यावरून खूप वाद झाला आणि शरद पवार यांनी जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून कॉंग्रेसवर दबाव आणण्याचे खूप डावपेच लढवले. कॉंग्रेसशी असलेली आघाडी मोडून भाजपाशी आघाडी करण्याचेही संकेत दिले. मोदींची अप्रत्यक्ष स्तुती करून पाहिली. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे लोकसभा निवडणूक लढवण्यास चांगल्या क्षमतेेचे १५ सुध्दा उमेदवार नाहीत. हे प्रत्यक्ष निवडणूक जवळ आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले. 

त्यासाठी त्यांनी शिवसेनेेतून फोडून उमेदवार आणले आहेत आणि कसेबसे २१ उमेदवार उभे केले आहेत.  हेही सगळे उमेदवार निवडून येण्याची खात्री देता येतील असे नाहीत. पण बर्‍यापैकी वाटावा असा उमेदवार त्यांनी आणलेला आहे. राजू शेट्टी यांनी ज्या हातकणंगले मतदारसंघातून २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकली त्या हातकणंगले मतदारसंघात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसजवळ उमेदवारच नाही. म्हणून त्यांनी हा मतदारसंघ स्वतःहून कॉंग्रेसला बहाल केला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गांभिर्याने जागा वाटप करायला बसले असते आणि कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेसला तुमच्याकडे सक्षम उमेदवार किती आहेत हे दाखवा अशी विचारणा केली असती तर शरद पवार यांना जागा वाटपात १५ जागांवर समाधान मानावे लागले असते. मात्र त्यांनी आता आयात उमेदवारांवर २१ जागा लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे. ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासाठी ही निवडणूक किती अवघड आहे हे लक्षात येते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिला बाहेरून आयात केलेला उमेदवार म्हणजे शिवसेनेचे आनंद परांजपे. हे कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे खासदार. शिवसेनेतल्या किरकोळ गैरसमजातून शिवसेनेतून बाहेर पडले. राष्ट्रवादीने चुचकारून त्यांना जवळ केले आणि राष्ट्रवादीला एक उमेदवार मिळाला. मावळ मतदारसंघात तर राष्ट्रवादीजवळ उमेदवारच नव्हता. राहुल नार्वेकर यांच्या रुपाने त्यांना मिळाला आणि शिवसेनेला खिजवण्याचे श्रेय मिळवून का होईना पण राष्ट्रवादीने मावळला उमेदवार तरी दिला. आता नार्वेकर यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले लक्ष्मण जगताप प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हेसुध्दा त्यादिशेने प्रयत्नाला लागले आहेत. अशा रितीने आधी शिवसेनेत असलेले नार्वेकर राष्ट्रवादीत जाऊन लढत आहेत आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले कार्यकर्ते त्यांना विरोध करत आहेत. एवढी राजकीय विसंगती सहन करूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या खासदारांची संख्या वाढवण्याची धडपड करायला लागली आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादीजवळ सक्षम उमेदवार नव्हता. म्हणून त्यांनी कॉंग्रेसमधल्याच राजीव राजाळे यांना उमेदवारी बहाल केली आहे. २००९ लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये सदाशीवराव मंडलिक यांनी पवारांना चांगलाच धडा शिकवला होता. त्यामुळे यावेळीसुध्दा तिथे कोणता उमेदवार यासाठी पवारांची बरीच चाचपणी चाललेली होती. शेवटी त्यांना सगळ्या पक्षात फिरून आलेले धनंजय महाडीक सापडले आणि आपण कोल्हापूरमध्ये निदान उमेदवार तरी देऊ शकतो याचे समाधान मिळवता आले. 

असाच प्रकारचा आयात उमेदवार रावेर मतदारसंघात त्यांना मिळवावा लागला. एकेकाळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करणारे अपक्ष उमेदवार मनीष जैन यांना राष्ट्रवादीने पावन करून घेऊन आपला उमेदवार केले आहे. अमरावतीमध्ये अपक्ष आमदार रवी राणा यांना गळ घालून त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीचे उमेदवार करून टाकले आहे. कसबसे उमेदवार मिळवून त्यांची पार्श्‍वभूमी विचारात न घेता त्यांना राष्ट्रवादीने अशी भराभर तिकिटे दिलेली आहेत. त्यातले कोण निवडून येणार आहे हा तर प्रश्‍न आहेच पण निवडून आल्यानंतर त्यातले किती खासदार पवारांशी एकनिष्ठ राहणार आहेत हाही प्रश्‍नच आहे. कारण यातल्या बर्‍याच उमेदवारांची पार्श्‍वभूमी सातत्याने पक्षांतरे करण्याची आहे. अर्थात, स्वतः शरद पवार यांचीही पार्श्‍वभूमी तशीच आहे. फोडाफोडी आणि पक्षांतरे हे त्यांच्या राजकारणाचे सूत्रच आहे. त्यांच्या या फोडाफोडीचा सर्वाधिक उपद्रव शिवसेनेला झालेला आहे. चार महिन्यापूर्वी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचे डावपेच आखायला सुरूवात करताना शिवसेनेच्या लोकांवर नजर ठेवायला सांगितले होते. तशी नजर ठेवून त्यांनी एवढी पक्षांतरे घडवली आहेत.

Leave a Comment