नवी दिल्ली – उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात सध्याच्या निवडणुकीमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशाच्या सीमा नेपाळशी लगत आहेत आणि या सीमेवर पोलिसांकडून पुरेशी तपासणी होत नाही. त्याचा फायदा होऊन नेपाळमार्गे पाकिस्तानातील काही लोक भारतात बनावट नोटा चलनात आणण्याची शक्यता वाटते.
बनावट नोटांच्या विरोधात काम करणार्या विशेष पोलीस दलांना या बनावट नोटांच्या विषयात सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मीरत हे या बनावट नोटांच्या कारस्थानांचे केंद्र असण्याची शंका आहे. मीरतमार्गे या नोटा दिल्लीपर्यंतही पोचवल्या जातात.
दिल्लीत दररोज या गोष्टींची चर्चा असते. आपण पाचशे किंवा हजार रुपयांची नोट घेतली, पण ती बनावट निघाल्यामुळे कसे फसलो याची हकीकत सांगणारे किती तरी लोक रोज पत्रकारांना भेटत असतात. पाकिस्तानात तयार होणार्या या बनावट नोटा काही एजंटांना निम्म्या किंमतींना विकल्या जातात आणि हे एजंट त्या नोटा खपवून शंभर टक्के कमाई करतात.