पुणे – नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी शंभर वर्षांपूर्वी जे विचार मांडले होते त्याच्या पुढे आपण अजून गेलेलो नाही, उलट आपली पिछेहाटच झाली आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी शनिवारी पुण्यात बोलताना व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नामदार गोखले यांचे विचार आणि आजचे राजकारण असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला होता, असे श्री. केतकर म्हणाले. भारतामध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य साधल्याशिवाय स्वातंत्र्य मिळवण्याला काही अर्थ राहणार नाही आणि हे ऐक्य साधण्यासाठी हिंदूंनीच पुढाकार घ्यायला हवा, मुस्लिमांना विशेष अधिकार द्यायलाही काही हरकत नाही असे गोखले यांचे विचार होते, असे केतकर म्हणाले.
सध्या भारतात होत असलेल्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता स्पष्ट दिसत आहे. तिचा एवढा ठसका कुमार केतकर यांना लागला आहे की, नामदार गोखले यांच्या संबंधातील भाषणात मोदी यांचा कसलाही संदर्भ नसताना त्यांनी मोदी यांना टोमणा मारण्याची संधी साधलीच. नामदार गोखले यांच्या सभांना आजच्यासारखी गर्दी होत नव्हती, असे म्हणून त्यांनी सध्याची गर्दी ही भडक आणि उग्र आहे असे तिरकस उद्गार काढले.